घरमहाराष्ट्रपर्यटकांना तानसा अभयारण्याची भूल

पर्यटकांना तानसा अभयारण्याची भूल

Subscribe

पावसाने उसंत घेतल्याने गर्दी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यातील घनदाट जंगलाने पावसाळ्यात हिरवीगार शाल परिधान केल्याचा भास होतो आहे. पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण बिंदू ठरलेल्या तानसा अभयारण्यातील वृक्ष विविध रंगाची फुलपाखरे पक्षांचा किलबिलाट वन्य प्राण्यांचा मुक्त संचार, सर्वत्र दिसणारी रान फुले हे सारे काही अभूतपूर्व निसर्ग सौंदर्य जवळून अनुभवायचे असेल तर तानसा अभयारण्याची एकदा तरी भटकंती केलीच पाहिजे. २५ दिवसांपूर्वी पूरस्थिती निर्माण करणार्‍या पावसाने थोडी उसंत घेतल्याने या ठिकाणी पर्यटकांंची पुन्हा गर्दी होत आहे.

मुंबईपासून शंभर किलोमीटर अंतरावर तानसा अभयारण्य हे सुंदर दाट वनराई असलेले विस्तीर्ण असे जंगल आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणार्‍या तानसा जलाशयाला चारी बाजूने अभयारण्याने वेढा घातलेला पाहायला मिळतो. राज्य सरकारच्या वनविभागाचे संरक्षित वनक्षेत्र असलेले तानसा वन्यजीव विभागाचे हे जंगल 1970 साली संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित झाले. येथे तानसा वन्यजीव अभयारण्याची निर्मिती झाली. शहापूर, खर्डी, परळी सुर्यमाळ, वाडा, वैतरणा असे सभोवताली जंगलांनी व्यापलेले तानसा अभयारण्य आहे. पावसाळ्यात येथील निसर्गाची मजा काही वेगळीच असते. तानसा तलावातील निळेशार पाणी आणि सभोवताली दिसणारे हिरवेगार जंगल हे नयनरम्य असे द़ृष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. अभयारण्यातील रान फुले पाहण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही.

- Advertisement -

वन्यजीवांचा मुक्त संचार

320 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या तानसा अभयारण्यात एकूण 212 पक्षांच्या विविध प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात. पावश्या, कोतवाल,कोकीळा, हळद्या, नाचन, घुबड, पिंगळ्या, खारीक, टक्काचोर, सुतार, टिटवी, खंड्या, दयाळ, लाव्हे, तिथर, शिकरा, धोबी, पित्ता गरुड, घार, करकोचा, पोपट, मोर असे अनेक पक्षी या ठिकाणी पहायला मिळतात. तानसाच्या जंगलात पावसाळ्यातील स्थलांतरीत चातक या अभयारण्यात दिसून येतो. अभयारण्यात सांबर, चितळ, काकर, चौशिंगा, भेकर, रानडुक्कर, कोल्हा, हरिण, तरस, ससे, माकड, वटवाघूळ या प्राण्यांचाही मुक्त संचार आहे.

- Advertisement -

तानसा अभयारण्यातील निसर्ग सौंदर्य हे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. येथील वनसंपदा, वन्य जीव जैवविविधतेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. हा निसर्ग ठेवा अमूल्य असा आहे. त्याचे सर्वांनी जतन केले पाहिजे. -संजय चन्ने, वनपरिक्षेत्र अधिकारी, तानसा वन्यजीव विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -