Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अबब, सारस्वतांच्या संमेलनाला तब्बल ४ कोटींचे ‘टार्गेट’

अबब, सारस्वतांच्या संमेलनाला तब्बल ४ कोटींचे ‘टार्गेट’

२ कोटींचे उपलब्धता असतानाही अधिक खर्चाचा आग्रह; कोरोनाने बिघडलेल्या आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष  

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बँकांवरही डबघाईस जाण्याची वेळ आली. नोकरदार वर्गापैकी अनेकांचे वेतन कापले गेले. एकूणच आर्थिक घडी कोरोनाने विस्कटून टाकली. ही घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता नाशकात होऊ घातलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी निधीची जमवाजमव सुरु झाली आहे. वास्तविक शासनाने दिलेला निधी आणि लोकप्रतिनिधींनी देऊ केलेला निधी बघता २ कोटींत चांगल्या प्रकारे संमेलन पार पडू शकते. पण बडेजाव मिरवण्याच्या नादात आयोजकांनी चक्क चार कोटींचा निधी संकलित करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. इतका निधी संमेलनावर खर्च करण्याची गरज आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आल्याने संमेलनाला सर्वचप्रकारचे ‘बळ’ लाभले आहे. नियुक्तीनंतर भुजबळांनी शासनाकडून ५० लाख रुपयांचा निधी मंजूरही करून घेतला. इतकेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व आमदारांना दहा लाख रुपये देण्याचे आवाहन केले. त्यानुसार १६ आमदारांनी १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी देण्याची तयारीही दर्शवत तसे संमतीपत्रही जिल्हा प्रशासनाला दिलेे. साधारणपणे आतापर्यंत दोन कोटीच्या आसपास निधी जमा करण्यात आला आहे. परंतु देश, विदेशातून येणारे साहित्यिक आणि मान्यवरांची उपस्थिती पाहता कराव्या लागणार्‍या आयोजनासाठी हा निधी पुरेसा नसल्याचे संयोजकांकडून सांगितले जाते. संयोजकांच्या अंदाजानुसार संमेलनासाठी ४ कोटींचा निधी अपेक्षित आहे. त्यामुळे अजूनही दोन कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे आवाहन आयोजकांपुढे आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निमा, आयमा, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक योगदान देण्याची साद घालण्यात आली. यात मान्यवरांच्या राहण्याची जबाबदारी शहरातील हॉटेल्स तसेच लॉन्सचालकांवर टाकण्यात आली आहे. मात्र, या बैठकीत आर्थिक मदतीसाठी अनेकांनी मौन पाळणेच पसंत केले. अखेर स्वागताध्यक्षांनी एकेकाला हेरून आयोजनात सहभाग नोंदवावा लागेल, असा प्रेमळ ‘इशारा’च दिला. तसेच ज्यांनी स्वतःहून जबाबदारी घेतलेली नाही त्यांना आयोजकांकडून जबाबदारी टाकण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. वास्तविक, कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम संमेलनाच्या उपस्थितीवर होणारच आहे. या परिस्थितीची जाणीव येणार्‍या साहित्यिकांनाही असल्याने त्यांना बड्या आयोजनाची अपेक्षाही नाही. परंतु भुजबळांचे पाठबळ जसे लाभले तसे आयोजकांच्या बेटकुळ्या फुगलेल्या दिसतात. त्यातून आता ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी काहींना ‘टार्गेट’ केले जाण्याचीही भीती व्यक्त होत आहे.

१६ लोकप्रतिनिधींनी दिली मदत

- Advertisement -

साहित्य संमेलनास आपल्या आमदार निधीमधून पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, डॉ. नीलम गोर्‍हे, डॉ. सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, अ‍ॅड. राहुल ढिकले, दिलीप बनकर, नितीन पवार, माणिकराव कोकाटे, डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे, दिलीप बोरसे अशा १६ लोकप्रतिनिधींनी साहित्य संमेलनास मदत आहे दिली. नाशिक सिटीझन फोरमचे अध्यक्ष हेमंत राठी यांनी सारस्वत बँकेच्या वतीने सात लाख रुपये व राम बंधू मसाले समूहाकडून ३ लाख अशी एकूण १० लाखांची मदत संमेलनासाठी जाहीर केली. तसेच संदीप फांउडेशन व भुजबळ नॉलेज सिटी या संस्थांनी प्रत्येकी २०० पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच हॉटेल सिटी प्राईड, हॉटेल सूर्या, हॉटेल हॉलीडे ईन, हॉटेल एमराल्ड पार्क या हॉटेल्सनेदेखील येणार्‍या काही पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे उपलब्ध निधीत संमेलन चांगल्या प्रकारे ‘साजरे’ होऊ शकते असे बोलले जाते.

  • कोटी- आयोजनासाठी हवे
  • ५० लाख- शासनाकडून मंजूर निधी
  • १.४५ कोटी- लोकप्रतिनिधींनी देण्यास दर्शवली अनुमती
  • कोटी- निधी अजून जमा करण्याचे संयोजकांचे ‘टार्गेट’

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -