घरमहाराष्ट्रअलिबाग वीज निर्मिती प्रकल्पातून टाटाची माघार

अलिबाग वीज निर्मिती प्रकल्पातून टाटाची माघार

Subscribe

आवश्यक त्या सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्या नाहीत, तसेच वीज खरेदीसाठी केलेल्या कराराची मुदतही संपल्यामुळे तालुक्यातील शहापूर-धेंरड परिसरातील प्रस्तावित औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातूनमाघार घेण्याची वेळ टाटा पॉवर कंपनीवर आली. कंपनीने तशा आशयाचे पत्रच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसीला) दिले आहे.

कंपनीने भूसंपादनासाठी एमआयडीसीला 248 कोटी रुपये दिले आहेत, तर प्रकल्पाच्या अनुषंगाने व सामाजिक जबाबदारी म्हणून 26 कोटी रुपये खर्च केले आहेत. हे सर्व पैसे परत मिळावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

- Advertisement -

सध्या उद्भवलेली परिस्थिती पाहता आता या ठिकाणी प्रकल्प उभारणे आमच्या हाताबाहेर गेले असून, संपादित जागा विनावापर राहणे राज्याच्या हिताचे नसल्याचे पत्रात म्हटले आहे.

खारेपाटातील शहापूर-धेंरड परिसरात 2007 पासूनच टाटा पॉवर कंपनीच्या कोळशावर आधारित 16 मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या परिसरातील शेतकर्‍यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. हा विरोध असतानाही भूसंपादन करण्यात आले आहे. 1600 मेगावॅटच्या प्रकल्पासाठी 258 हेक्टर जागा संपादित होणे अपेक्षित असताना 387 हेक्टर जमिन संपादित झाली आहे. म्हणजेच जवळजवळ 130 हेक्टर अतिरिक्त जमिनीचे प्रकल्पासाठी संपादन झालेआहे. असे असतानाही कंपनीला आतापर्यंत प्रकल्प उभारण्याच्या हालचाली करता आलेल्या नाहीत. गेल्या 13 वर्षांत कंपनी या ठिकाणी प्रकल्पाची एक वीटही रचण्यात यशस्वी झाली नाही.

- Advertisement -

या प्रकल्पाविरोधात खारेपाटातील शेतकर्‍यांनी सुरूवातीपासून संघर्ष केला. विविध प्रकारची आंदोलने झाली. वेगवेगळ्या मार्गाने प्रकल्पाला विरोध करण्यात आला. गेले 13 वर्षे हा संघर्ष सुरू आहे. राजकीय पक्षांनी या प्रकल्पासंदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. तरी देखील शेतकर्‍यांनी आपापल्यापरीने लढा सुरूच ठेवला. टाटाने या प्रकल्पातून माघार घेतल्याने तेथील शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला आहे.

आमच्या 13 वर्षांच्या लढाईतील विजयाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु आमची लढाई अद्याप संपलेली नसून सुरूच राहणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या नाहीत किंवा संमतीही दर्शवली नाही त्या जमिनींवरील भूसंपादनाचे शिक्के पुसून टाकावेत, अशी आमची पुढची मागणी राहणार असून, त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी आम्ही चालवली आहे.
-राजन भगत, जिल्हा संघटक, श्रमिक मुक्ती दल

नाईन ड्रॅगनच्या हालचाली
टाटाने या प्रकल्पातून माघार घेतल्यानंतर धरमतर खाडी किनारी नवीन प्रकल्प आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ‘नाईन ड्रॅगन्स’ ही चिनी कंपनी महाराष्ट्रात साडेचार हजार कोटीची गुंतवणूक कागद निर्मिती क्षेत्रात करण्यास तयार झाली असून, मुख्यमंत्री आणि कंपनीच्या अधिकार्‍यांमध्ये एक सामंजस्य करार झाला असल्याची माहिती समजते. रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडी किनारी एमआयडीसीने संपादित केलेल्या जागेवर हा प्रकल्प पुढील दोन वर्षात सुरू करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -