राज्यव्यापी संपात शिक्षकांचाही सहभाग, बारावीच्या परीक्षांचं काय? संघटनेने केलं स्पष्ट

maharashtra board examination student gets 10 minutes more in ssc and hsc exam

मुंबई – जुन्या पेन्शन योजनेसाठी आजपासून राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, बारावीच्या परीक्षा घेणार असल्याची भूमिका राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेने घेतली आहे. परंतु, संपकाळात बारावी बोर्ड परीक्षा उत्तरपत्रिका तपासणार नाही, असंही संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, परीक्षा झाल्या तरीही पेपर तपासणीसाठी उशीर झाल्यास निकाल उशिराने लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीने काल बैठक घेतली होती. या बैठकीत बारावी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेचे वेळापत्रक बिघडू नये, विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करावा लागू नये आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, संपकाळात फक्त बारावीच्या परीक्षा घेणार. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी तसेच अकरावीच्या परीक्षा, मूल्यमापन, अध्यापन करणार नसल्याची भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे.

हेही वाचा – जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आजपासून संपावर, सरकारचा कारवाईचा इशारा

जुनी पेन्शन योजना लागू करण्याबरोबरच विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विविध सरकारी कर्मचारी संघटनांशी केलेली चर्चा निष्फळ ठरल्याने आज मंगळवारपासून राज्यातील १८ लाख सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालये, शाळा, कॉलेज, पालिका, जिल्हा परिषदा, तहसीलदार कार्यालये यांसह सरकारी विभागांचे कामकाज ठप्प पडण्याची शक्यता आहे, मात्र राजपत्रित अधिकारी महासंघाने तूर्त संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघ १८ मार्चनंतर आंदोलनाबाबत भूमिका घेणार आहे.