Mumbai AC Local: एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचा संताप

AC Local

पश्चिम रेल्वे मार्गिकेवर प्रवाशांनी एसी लोकल थांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकलमधील एसी बंद पडल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त करत ही गाडी थांबवली. मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकात प्रवाशांनी ही एसी लोकल थांबवली. ही लोकल ७.५६ मिनटांची विरारहून चर्चगेटला जाणारी ही एसी लोकल होती. परंतु एसीत तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांनी गाडी थांबवली.

वांद्रे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी लोकल गाडीचं दार बंद होऊ दिलं नाही. यामुळे ७-८ मिनीटं गोंधळ सुरूच होता. मात्र, एसी झाल्यानंतर आणि दार बंद झाल्यानंतर ट्रेन रवाना झाली.

काही दिवसांपूर्वी विरार रेल्वे स्थानकावर अशाच प्रकारचा एक किस्सा घडला होता. रात्री साडेअकरा वाजता विरार स्थानकात एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी मोठा गोंधळ घातला होता. रात्री ११.३० च्या सुमारास मुंबईहून विरारकडे जाणारी एसी ट्रेन नालासोपारा रेल्वेस्थानकात थांबली. मात्र, त्यावेळी ट्रेनचे दरवाजेच उघडले नाहीत. त्यानंतर एसी लोकल विरार स्थानकात जाऊन थांबली. तेव्हा संतप्त प्रवाशांनी विरार स्थानकात चांगलाच गोंधळ घातला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, संतप्त झालेल्या प्रवाशांनी एसी लोकलच्या मोटरमनला ट्रेनच्या केबिनमध्येच कोंडून ठेवले होते. परंतु रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मोटरमनची सुटका करण्यात आली. मात्र, हा प्रकार मोटरमनच्या चुकीमुळे की तांत्रिक बिघाडामुळे घडला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दरम्यान, मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशीराने धावणे किंवा रद्द होणे, ही काही नवीन बाब राहिलेली नाही. परंतु एसी लोकलचे दरवाजे न उघडणे किंवा एसीमध्ये तांत्रिक बिघाड होणे, अशा प्रकारची अनेक कारणं आता समोर येत असून प्रशासनानं लक्ष देणं खूप गरजेचं आहे.


हेही वाचा : हेल्मेटसक्तीला विरोध करणाऱ्या पुण्यात आज लाक्षणिक हेल्मेट दिवस