घरताज्या घडामोडीतिसर्‍या आघाडीची सुरुवात महाराष्ट्रातून

तिसर्‍या आघाडीची सुरुवात महाराष्ट्रातून

Subscribe

सुडाचे राजकारण आमचे हिंदुत्व नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपला खडेबोल

शिवसेना-भाजप नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपले मौन सोडत भाजपला अप्रत्यक्षपणे खडेबोल सुनावले आहेत. देशातील राजकारण अत्यंत गढूळ होत चालले असून राज्यकारभार राहिला एका बाजूला, इथे केवळ सूडाचे राजकारण सुरू झाले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. सुडाचे राजकारण आमचे हिंदुत्व नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला खडेबोल सुनावले. सोबतच परिवर्तनाच्या मुद्यावर आमचे एकमत झाले आहे. आज एक नवी सुरुवात आम्ही केली आहे. त्याला आकार येण्यास काहीसा वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा इशारा देखील दिला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी रविवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दीड तासांच्या चर्चेनंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो नेहमीच यशस्वी होतो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्ध्यांकडून देशाला खूप प्रेरणा मिळाली. त्याच प्रेरणेवर आम्हाला वाटचाल करायची आहे. आम्हाला अन्याय, अनैतिक गोष्टींविरुद्ध लढायचे आहे. देशातील राजकीय परिवर्तनावर आमच्यात चर्चा झाली असून एक चांगली सुरुवात म्हणून आम्ही या भेटीकडे पाहत आहोत. लवकरच बिगर एनडीए मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे. – के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगणा

- Advertisement -

शरद पवारांनी पुढाकार घ्यावा

के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. यावेळी देशात भाजपविरोधातील परिवर्तनासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा. देशात चांगल्या पद्धतीने विकास होत नसल्याने परिवर्तनासाठी समविचारी लोकांनी एकत्र यावे, असे राव यांनी आवाहन केले. तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी शरद पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, बर्‍याच दिवसांपासून आमच्या भेटीचे प्रयोजन होते. परंतु शिवाजी महाराजांच्या जयंतीनंतर दुसर्‍या दिवशी आमची भेट झाली हे विशेष. या सदिच्छा भेटीबाबत लपवण्यासारखे काही नाही. पण देशातील राजकारण अत्यंत गढूळ होत चालले आहे. देशात सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. आमचे राजकारण तसे नाही. या गोष्टी अशाच सुरू झाल्या तर देशाचे भवितव्य काय? सूडाचे राजकारण करणे ही आमची परंपरा नाही. हे आमचे हिंदुत्व नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

- Advertisement -

संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसारले आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा सख्खे शेजारी आहेत. राज्या राज्यात एक आपुलकीचे नाते राहिले पाहिजे. त्याची सुरुवात आज नव्याने झाली आहे. त्याला आकार येण्यास वेळ लागेल; पण प्रयत्न तर केले पाहिजेत. देशातील मूलभूत प्रश्न सोडून इतर विषयांत हात घालण्यातच अनेकजण धन्यता मानत आहेत. त्यामुळे देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या मुद्यावर आमचे एकमत झाले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर, महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत. महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. देशातील राजकीय परिवर्तनावर आमच्यात चर्चा झाली. लोकशाही आम्ही लढणार आहोत. त्याची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून केली आहे. आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थितीवर चर्चा करणार आहोत, असे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंनी लवकरच तेलंगणा येथे यावे, असेही निमंत्रण त्यांनी यावेळी दिले. या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे, तेजस ठाकरे यासह अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या दोन मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली. तिसर्‍या आघाडीवर ही चर्चा झाल्याचे समजत आहे. यानंतर चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचीही भेट घेतली. भाजपविरोधात मैदानात उतरलेले चंद्रशेखर राव केंद्रीय पातळीवर तिसर्‍या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोन प्रमुख नेत्यांमधील भेट महत्त्वाची मानली जात आहे.

तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि केंद्रातील मोदी सरकार यांचे काही काळापूर्वी चांगलेच सख्य होते. परंतु अर्थसंकल्प सादर झाल्यापासून राव सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी बर्‍याचदा लक्ष्य केले आहे. पंतप्रधानांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊनही ते शांत झालेले नाहीत. उद्धव ठाकरेंनी के. चंद्रशेखर राव यांना फोन करुन मोदींविरोधातील लढ्याला पाठिंबा दिला होता. तसेच त्यांना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले होते.

तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचा मनोदयही व्यक्त केला होता. या दोघांतील चर्चेवेळी तेजस ठाकरे देखील उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -