तासगाव तालुक्यातील आठ आणि कवठेमंहाकाळ तालुक्यातील नऊ गावांचा टेंभू योजनेत समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने काढावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमन पाटील आणि त्यांचे पुत्र युवा नेते रोहित पाटील यांनी आज कार्यकर्त्यांसह सांगली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या या उपोषणाला काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. या उपोषणावर आता एक अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित केलं आहे. (Tembhu Pani Yojana Suman Patil Rohit Patil s hunger strike called off after Devendra Fadnavis promise)
आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित केलं असलं तरी आश्वासनाप्रमाणे जर एक महिन्यात काम सुरू झालं नाही तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाच्या हस्ते सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर आणि सांगलीचे जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांचा फोन
टेंभू योजनेच्या विस्तारीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील आणि युवानेते रोहित पाटील हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. आज आंदोलनाचा दुसरा दिवस होता. त्यावेळी स्टेजवरच रोहित पाटलांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. त्यावेळी तासगावमधील गावांना पाण्यासाठी एका महिन्यात प्रशासकीय मान्यता देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.
काय आहे प्रकरण ?
सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातील सात तालुक्यात 210 गावातील लाभ क्षेत्राला पाणी देण्यासाठी टेंभू योजना तयार करण्यात आले आहे. या योजनेतील कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील 17 गावांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी सुमन पाटील सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे.
(हेही वाचा: कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देतायत, पण…, काँग्रेसकडून आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी )