‘कोरोनाचं सावट कायमचं जाऊ दे’: मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब घेतलं मुंबादेवीचं दर्शन

Temple Reopen CM Uddhav Thackeray visit Mumbadevi with his family
मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब घेतले मुंबादेवीचं दर्शन

घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाला असून आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतूक केले.

कोरोनाचे नियम पाळून सुरक्षित राहा

“आपली मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली होत आहेत. माझी सर्व जनतेला आणि भक्तांना विनंती आहे, की आनंदात राहा, मात्र कोरोनाचे नियम पाळून सुरक्षित राहा”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.