Temple Reopen : राज्यात १०५ दिवसांनी मंदिरे खुली, नवरात्रौत्सवासाठी मंदिरांमध्ये जय्यत तयारी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे तब्बल १०५ दिवस बंद असणारी मंदिरे आज गुरूवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुली झाली. नवरात्रौत्सवामुळे मंदिरे खुली झाल्याने भाविकांनीही पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दाखवला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मुंबादेवीचे दर्शन घेतले. कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्थेसाठी मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक 

सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतूक केले.

यावेळी महापौर किशोरी पेडणेकर आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. राज्यातील विठ्ठल रूक्मिणी मंदिर, परळी वैजनाथ, कोल्हापूरच्या महालक्ष्मी, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ठिकाणीही भाविकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे कुलदैवत मुंबादेवीचे दर्शन घेतल्यानंतर कोरोनाचे नियम पाळून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली होत आहेत. माझी जनतेला विनंती आहे की, आनंदात रहा, मात्र कोरोनाचे नियम पाळा असेही ते म्हणाले. मोठ्या कालावधीनंतर मंदिरे खुली झाल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका करण्याची हीदेखील संधी सोडलेली नाही. भाजप आणि मनसे अशा दोन्ही पक्षांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. (Temple reopen in maharashtra after 105 days of covid second wave fear)

महालक्ष्मी, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरही खुले

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते सात वाजता आरती करण्यात आली. तर पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिर हे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते खुले करण्यात आले. कोरोनामुळे गेली पावणेदोन वर्षे मंदिरे बंद होती, पण आता मंदिरे खुली झाल्याने आनंद होत आहे. आपण कोरोनाचे नियम पाळू आणि कोरोना हरवुयात असेही आवाहन त्यांनी यावेळी केली. बीडच्या परळी वैजनाथ येथे बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच मंदिरात पोहचून दर्शन घेतले. परळी वैजनाथ मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

विठ्ठल रूक्मिणी मंदिरात फुलांची आरास

पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिराला गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक आणि नयनरम्य अशी तुळशीच्या पानाची व झेंडू, अष्टर, गुलाब, शेवंती अशा सुंदर आणि मनमोहक फुलांची आरास करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नियम पाळूनच भाविकांनी मंदिरातील दर्शन खुले करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी मंदिरांमध्ये सॅनिटायजेशनही करण्यात आले आहे.

भाजपची टीका