५० टॅम्पो, १ ट्रक चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड; २२ गुन्ह्यांची उकल

आरोपींच्या अटकेनंतर त्यांनी चोरलेली चार कोटी ७५ लाख रुपये किंमतीचे ४८ आयशर टेम्पो, दोन टाटा टेम्पो, एक अशोक लेलँड ट्रक, दोन कार आदी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. पोलीस जप्त केलेल्या वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेत आहेत. तसेच यातील फरार आरोपींचाही शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी दिली.

भाईंदरः देशातील विविध राज्यांमध्ये ट्रक, टेम्पो अशी अवजड वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईनंतर २२ गुन्ह्यांची उकल झाली असून पोलिसांनी चोरट्यांकडून चोरलेली चार कोटी ७५ लाख रुपये किंमतीची ५३ वाहने जप्त केली आहेत.

आरोपींच्या अटकेनंतर त्यांनी चोरलेली चार कोटी ७५ लाख रुपये किंमतीचे ४८ आयशर टेम्पो, दोन टाटा टेम्पो, एक अशोक लेलँड ट्रक, दोन कार आदी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. पोलीस जप्त केलेल्या वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेत आहेत. तसेच यातील फरार आरोपींचाही शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी दिली.

काशिमीरा येथील विनयकुमार पाल यांचा आयशर टेम्पो चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा एकच्या पथकाने तपास हाती घेतला होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा माग काढत पोलिसांनी बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत फारुख तैय्यब खान (३६, रा. फखरुद्दीनका, ता. टिजारा, जि. अलवार, राजस्थान) आणि मुबीन हारिस खान (४०, रा. फखरुद्दीनका, ता. टिजारा, जि. अलवार, राजस्थान) या दोन चालकांना राजस्थान पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले होते.

या दोघांच्या अटकेनंतर पोलिसांच्या हाती अनेक धक्कादायक माहिती लागली. दोन्ही आरोपींनी गुजरात, राजस्थान आणि हरयाणामधील बारा साथिदारांच्या मदतीने महाराष्ट्र, हरयाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली आदी राज्यातून ट्रक, टेम्पो, कार चोरण्याचा धंदा सुरु केला होता. चोरलेल्या वाहनांचा मुळ इंजिन आणि चेसिस नंबर बदलून त्यावर बनावट कागदपत्रांच्या मदतीने ही टोळी बनावट इंजिन आणि चेसिस नंबर टाकून विविध आरटीओ विभागात नोंदणी करायचे. त्यानंतर या वाहनांची विक्री करायचे.

तपासात आतापर्यंत या टोळीने विविध राज्यात बावीस गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकले, पुष्पराज सुर्वे, सुहास कांबळे, सहाय्यक फौजदार राजू तांबे, संदीप शिंदे, किशोर वाडिले, संजय पाटील, संतोष चव्हाण, अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, प्रफुल्ल पाटील, विकास राजपूत, समीर यादव, प्रशांत विसपुते, सनी सूर्यवंशी यांच्या पथकाने राजस्थान, गांधीनगर, अहमदाबाद पोलिसांच्या मदतीने केली.