मुंबई : मराठवाड्यात आज, शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. कॅबिनेट बैठकीआधी राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडवून घेतले. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारला तीस दिवसांची मुदत दिली असून उपोषण सुटले असले तरी आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका जरांगे-पाटलांनी घेतली. उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावे अशी उपोषणकर्त्या नेत्यांची इच्छा होती, पण मुख्यमंत्री आले, दोन उपमुख्यमंत्री आले नाहीत. संभाजीनगरातील मंत्रिमंडळ बैठकीस कोणतेही अडथळे नकोत. सरकारी वाहनांवर, मंत्र्यांवर हल्ले वगैरे होऊ नयेत यासाठी सरकारने वेळ मारून नेली आहे, असे सांगत ठाकरे गटाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा – त्याच घोषणा आणि तीच फसवणूक… ठाकरे गटाची राज्य सरकारवर जोरदार टीका
मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून सततचा दुष्काळ आहे. मंत्रिमंडळ बैठकीचे सोपस्कार पार पाडले जातात, पण हाती काहीच लागत नाही. आता मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचे महत्त्व जाणून सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेतली. अमृत महोत्सवाच्या एका सोहळ्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा संभाजीनगरात अवतरणार होते, पण प्रशासनाने कार्यक्रमाची संपूर्ण आखणी केल्यावर अचानक अमित शहांनी मराठवाड्यात येणे टाळले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय किंवा केंद्रीय गृहमंत्री शहा काय, शहरात येऊन त्यांनी लोकांच्या तोंडास पानेच पुसली असती, अशी टीकाही सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.
हेही वाचा – संजय राऊतांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेचा घेतला पास, पण…
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव आणि दुष्काळ राहिला बाजूला, राज्य सरकारने आपल्या राजेशाही थाटाचेच दर्शन मराठवाड्याला घडवले. आज मराठवाड्यात मुख्यमंत्री येतील व झेंडा फडकवून निघून जातील. मराठवाडी जनता मात्र पुन्हा एकदा फसवणुकीच्या ओझ्याखाली चिरडून जाईल, असे या अग्रलेखात म्हटले आहे.
‘शासन आपल्या दारी’ अशा कार्यक्रमांचा छंद ‘मिंधे सरकार’ला जडला आहे. या छंद किंवा व्यसनापायी प्रत्येक कार्यक्रमावर बेहिशेबी चार-पाच कोटींची उधळण व कंत्राटबाजी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरात आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी लाखो रुपये खर्च करून शहरातील एकूण एक सारी महागडी हॉटेल्स सरकारकडून बुक करण्यात आली. शिवाय दिमतीला शेकडो गाड्या-घोड्या आहेतच. अशा पंचतारांकित वातावरणात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून ही बैठक पार पडेल. म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीसाठी नाव मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचे आणि बाता मराठवाड्यातील दुष्काळावर फुंकर वगैरे मारण्याच्या असल्या तरी बैठकीचा सगळा थाटमाट राजेशाहीच आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.
हेही वाचा – शासनाने युवकांच्या आयुष्याशी खेळू नये, रोहित पवारांकडून ‘तो’ जीआर रद्द करण्याची मागणी
आधी फडणवीसांनी मराठवाड्यासाठी घोषणांची बरसात केली. आता बेकायदेशीर मुख्यमंत्री ‘श्रीमान मिंधे’ तेच करतील. मुळात शिंदे-फडणवीस-अजित पवारांचे सरकार बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या घोषणा, घेतलेले निर्णय बेकायदेशीर ठरणार आहेत. तरीही कॅबिनेटच्या सरबराईसाठी सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. उद्या हे सरकार ‘बाद’ ठरल्यावर या पैशांची वसुली कायदेशीर मार्गाने करावी लागेल, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.