घरताज्या घडामोडीनाशिक शहरासह जिल्ह्यात अखेर लॉकडाऊन जाहीर

नाशिक शहरासह जिल्ह्यात अखेर लॉकडाऊन जाहीर

Subscribe

वैद्यकीय, अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त घराबाहेर पडल्यास कारवाई

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात १२ मे दुपारी १२ वाजेपासून २३ मेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार केवळ वैद्यकीय कारणांसाठीच बाहेर पडता येणार आहे. तसेच वैद्यकीय सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जाहीर केले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शहरात कोरोना रुग्णसंख्या चार हजारांवर स्थिर आहे. तर ग्रामीण भागात मात्र रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. विशेष करून बाजार समित्यांमध्ये गर्दी होत असल्याने या बाजार समित्याच कोरोना सुपर स्प्रेडर ठरत असल्याने याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेण्याबाबतचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. राज्यात ज्या प्रमुख शहरांत कोरोना रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक आहे, यात नाशिकचादेखील समावेश होतो. याआधी पॉझिटिव्हिटी रेटदेखील ४० टक्क्यांवर गेला होता. आता तो २६ ते २८ टक्क्यांवर आला असला तरी रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली आहे. सध्या सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत नागरिकांना खरेदीची मुभा दिली आहे. मात्र, तरीही रस्त्यावर गर्दी कायम आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बारामती, सांगलीच्या धर्तीवर नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यानुसार आता १२ ते २२ मेपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

असा असेल लॉकडाऊन

लॉकडाऊन काळात वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू राहतील. किराणा मालाच्या होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे. तर भाजीपाला विक्रीही सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. परंतु, याकरिता निश्चित करून दिलेल्या जागेवरच विक्रेत्यांना भाजीपाला, फळे, विक्रीची परवानगी असेल. तसेच पेट्रोलपंप केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना वैद्यकीय तसेच अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -