Gulab Cyclone: मराठवाड्याला पावसाचा तडाखा; ४८ तासांत १० जणांचा मृत्यू

ten people died due to heavy rain in Marathwada
Gulab Cyclone: मराठवाड्याला पावसाचा तडाखा; ४८ तासांत १० जणांचा मृत्यू

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे काही जिल्ह्यातील नदीला पूर आला आहे. पुढील काही दिवस अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाड्यात काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाड्यातील या मुसळधार पावसामुळे गेल्या ४८ तासांत १० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ठिकठिकाणी घराचं नुकसान झालं असून जनावरं वाहून गेली आहेत. पुढील २४ तास मराठवाडा जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुलाब चक्रीवादळ रविवारी रात्री ११.३० वाजता जमिनीवर पूर्णपणे धडकले. यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. पण पुढे सोमवारी त्याच्या प्रवास पश्चिमेकडे होत राहिला. मग तीव्रता कमी झाल्यानंतर त्याचे रुपांतर कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाले. यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पुढील दोन ते तीन दिवस तीव्र पाऊस पडणार आहे, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात तीन, उस्मानाबाद आणि परभणीत दोन, जालना, नांदेड आणि लातूरमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात एकूण १० जण मृत्यूमुखी पडले आहेत.

या व्यतिरिक्त पुरामुळे २०० जनावरे वाहून गेली आहेत. हवामान विभागाने औरंगाबाद, जालना जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसानं झालं आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जिल्ह्यातील १८० मंडळात ६५ मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.


हेही वाचा – पावसाचा धुमाकूळ : नांदगावसह येवला, दिंडोरीत पिकांचं मोठं नुकसान