सोनसाखळी हिसकावून पळणाऱ्यास दहा वर्षे सश्रम कारावास, ठाणे न्यायालयाचा निकाल

ठाणे: टोळी येत रस्त्यावरून पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातीळ सोनसाखळी हिसकावून पळणाऱ्या अजिज अब्बास उर्फ जाफर सैय्यद उर्फ जाफरी आणि जाफर आजम सैय्यद या सोनसाखळी चोरट्यांना ठाणे विशेष मोक्का न्यायाधीश अ.एम.शेटे यांना सोमवारी मोक्कांतर्गत दोषी ठरवले. तसेच त्या दोघांना दहा वर्षे सश्रम कारावास आणि पाच लाखांचा दंड अशी शिक्षा सुनावली अशी माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली. हा प्रकार कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१६ मध्ये घडला होता.

आरोपी आणि त्यांचे इतर फरार दोन साथीदार असे चौघे जण वेगवेगळ्या दोन मोटार सायकलवरून येत. दोघे जण पुढे येऊन पायी जाणाऱ्या महिलेला आगे मर्डर हुआ है, आप आज मत जाओ. अशी बतावणी करत त्यानंतर आरोपी दोघे दुसऱ्या मोटारसायकलवरून येत गळ्यातील मंगळसूत्र व नेकलेस हिसकावून घेऊन जात. अशापद्धतीने, २ जुलै २०१६ रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या प्रकारात आरोपींना दक्ष नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.

याप्रकरणी तत्कालीन कल्याण गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी प्राथमिक अहवाल सादर केल्यावर तत्कालीन सहायक आयुक्त व सेवा निवृत्त अधिकारी व्ही एन फुलकर यांनी त्या संपूर्ण मोक्का गुन्ह्याचा तपास करून तत्कालिन ठाणे शहर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या मंजूरीने MCOCA दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात केला. हा खटला विशेष मोक्का न्यायाधीश अ. एम. शेटे यांच्यासमोर आल्यावर सरकारी वकिल संजय मोरे यांनी सादर केलेले पुरावे आणि १३ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून त्या दोघांना दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावास व ५ लाख दंड आणि दंड न भरल्यास ३ वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.


हेही वाचा : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात ६ हजार ३८३ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर