घरदेश-विदेशअखेर युद्धाला तोंड फुटले! रशियाचा युक्रेनवर हल्ला

अखेर युद्धाला तोंड फुटले! रशियाचा युक्रेनवर हल्ला

Subscribe

18 हजारांहून अधिक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले, पंतप्रधान मोदींनी घेतली तातडीची बैठक, नागरिकांना एअरलिफ्ट करणार

रशिया आणि युक्रेनमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तणाव अखेर गुरुवारी युद्धात बदलला. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर रशियाच्या सैन्यदलाने युक्रेनमध्ये घुसत रणगाड्यांसह हल्ले करण्यास सुरुवात केली. रशियाने आतापर्यंत युक्रेनचे 74 लष्करी तळ आणि 11 हवाई तळ नष्ट केले आहेत. या हल्ल्यात युक्रेनमधील 40 सैनिकांसोबत 10 नागरिकांचा मृत्यू झाला असून असंख्य नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर युक्रेनच्या सैन्यानेही रशियाच्या 50 जवानांना ठार करण्यासोबतच रशियाची 5 विमाने आणि 1 हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. युक्रेनमध्ये 18 हजारांहून अधिक भारतीय नागरिक अडकलेले असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी रननीती ठरविण्याकरीता दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्रीही उपस्थित होते.

रशियाने युक्रेनच्या उत्तरेकडून हल्ला केला असून रशियन सैन्य युक्रेनच्या भूप्रदेशात शिरले आहे. रशियन लष्कर ईशान्येकडून घुसखोरी करत असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. देशाची राजधानी कीव आणि दुसरे सर्वात महत्वाचे शहर असणार्‍या कारकीवमधील लष्करी तळांवर रशियाने मिसाईलने हल्ला केल्याचे युक्रेनच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे. युक्रेनमधील डोन्बास प्रांतावर हल्ला करण्यासह मारियुपोल शहरात रशियाने अनेक रणगाडे घुसले आहेत. रशियाने अनेक बाजूंनी युक्रेनवर आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनने नागरी विमानांसाठी हवाई वाहतूक बंद केल्याने शहर सोडून जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांग रांगासह मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

- Advertisement -

मोदींना मध्यस्तीचे आवाहन
युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी मध्यस्तीचे आवाहन केले आहे. भारताचे रशियाशी वेगळे नाते आहे. परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वीच भारत यात हस्तक्षेप करून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आम्ही पंतप्रधान मोदींना आवाहन करतो की त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि आमचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात त्वरित चर्चा घडवून आणावी, असे युक्रेनच्या भारतातील राजदूतांनी म्हटले आहे.

दरम्यान, युक्रेनला जाणारी सर्व विशेष उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. तर १८ हजारांहून अधिक भारतीय नागरिक आणि २० हजारांहून अधिक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या सर्वांना एअरलिफ्ट करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 182 विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे. यापैकी बहुतेकजण युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत.

- Advertisement -

सोव्हिएत महासंघाचा भाग
युक्रेन हा देश 1990 पर्यंत सोव्हिएत महासंघाचा भाग होता. सोव्हिएत महासंघाचे विघटन झाल्यानंतर युक्रेन स्वतंत्र झाला. युक्रेनच्या वाट्याला सोव्हिएत महासंघाच्या काळात विकसित करण्यात आलेले महत्त्वाचे बंदर, लष्करी विभाग आले. स्वतंत्र्यानंतर युक्रेनचे रशियासोबत चांगले संबंध होते. परंतु 2014 मध्ये युक्रेनच्या रशिया समर्थक राष्ट्राध्यक्षांची हकालपट्टी झाल्यावर रशियाने केलेल्या आक्रमणानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. त्यानंतर युक्रेनने नाटोमध्ये सामील व्हायचे ठरवल्यापासून दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास नाटो देशांचे सैन्य आणि तळ आपल्या सीमेजवळ येतील, असे रशियाला वाटत आहे. त्यामुळे नाटोत सामील न होण्यासाठी रशियाकडून दबाव आणला जात होता. तर अमेरिका युक्रेनला पाठिंबा देत होता. त्याचीच परिणीती युद्धात झाली.

रशियाने युक्रेनवर असाच हल्ला सुरू ठेवला, तर त्याच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही १०० हून अधिक लढाऊ विमाने हाय अलर्टवर ठेवली आहेत, असे जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले. आमच्या हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी आमच्याकडे १०० हून अधिक लढाऊ विमाने आणि भूमध्य समुद्रापर्यंत समुद्रात एकूण १२० हून अधिक युद्धनौका हाय अलर्टवर आहेत, असा इशारा ’नाटो’ने दिला आहे.

इतिहास लक्षात ठेवेल – बायडेन
युक्रेन-रशिया युद्धात इतर कोणत्याही देशाने लष्कर घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम भयानक असतील. अमेरिकेने युद्धात भाग घेतल्यास इतिहास लक्षात ठेवेल असे उत्तर देऊ, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लाादिमीर पुतीन यांना दिला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचे शेअर बाजारावर पडसाद

रशिया-युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचे पडसाद मुंबई शेअर बाजारावर देखील पडले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स गुरुवारी तब्बल 2 हजार अंकांनी कोसळला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीलाही मोठा धक्का बसला आहे.

गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स तब्बल 2700 अंकांनी कोसळून 54,529 वर पोहोचला. तर दुसरीकडे निफ्टी देखील 815 अंकांनी घसरून 16,247 वर गेला. सेन्सेक्सच्या इतिहासातील ही आतापर्यंतची चौथी सर्वात मोठी, तर वर्षभरातील दुसरी मोठी पडझड आहे. या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराच्या नोंदणीकृत कंपन्यांची मार्केट कॅप 255.68 लाख कोटी रुपयांनी घटून 242.28 लाख कोटी रुपयांवर आली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे 13.4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

निफ्टीचे सर्वच्या सर्व 50 शेअर्स हे रेडझोनमध्ये गेले आहे. तर सेन्सेक्सच्याही 30 शेअर्सला मोठा फटका बसला आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी बाजारातून पैसे काढून घेण्याकडे त्यांचा कल आहे. तर दुसर्‍या बाजूला कच्च्या तेलाचे दरही उच्चांकावर जाऊन पोहोचल्याने बाजारात तणाव निर्माण झाला आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना

युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक विशेषत: विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पहावे तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला केल्या आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून उद्योग, शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून मुख्य सचिवांना केंद्र शासनाशी समन्वय साधून या नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -