मालाडमधून दहशतवाद्याला अटक, महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

maharashtra ats

मुंबई – मुंबईतून एका दहशतवाद्याला पकडण्यात महाराष्ट्र एटीएसला यश आले आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी मुळचा पंजाबचा असून महाराष्ट्र एटीएसने त्याला बुधवारी अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कॅनडातील वाँटेड दहशतवादी लखबीर सिंग लांडा याच्या संपर्कात असल्याचं तपासात उघड झाल्याची माहिती महाराष्ट्र एटीएने दिली आहे.

चरतसिंग उर्फ इंद्रजितसिंग करिसिंग उर्फ कारज सिंग (३०) असं अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. त्याच्याविरोधात आठ गुन्हे दाखल आहेत. पंजाबच्या कपूरथला तुरुंगातून तो दोन महिन्यांच्या पॅरोलवर बाहेर होता. पॅरोल कालावधीत त्याने त्याच्या साथीदारांसह पंजाब पोलीस, इंटेलिजेंस हेड क्वार्टर, मोहाली येथे ९ मे २०२२ रोजी रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) ने हल्ला केला.


महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला त्याच्याविषयी माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी मालाडमधून त्याला ताब्यात घेतले. तो कॅनडामधील लखबीर सिंग लांडा नावाच्या वॉन्टेड दहशतवाद्याच्या संपर्कात असल्याचं तपासातून उघड झालंय. त्यामुळे पुढील कारवाई करण्यासाठी त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.