Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश सणासुदीत बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळला

सणासुदीत बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळला

महाराष्ट्रात राहणाऱ्या अतिरेक्याला रेल्वेत केली अटक, भारतातून मस्कतमार्गे जाऊन पाकिस्तानात घेतले प्रशिक्षण

Related Story

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा अतिरेक्यांपैकी एक महाराष्ट्र, दोन दिल्ली, तर उर्वरित चार अतिरेक्यांना राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. ऐन सणासुदीच्या काळात भारतातील काही शहरांमध्ये मोठे बॉम्बस्फोट करण्याचा या अतिरेक्यांचा कट असल्याची माहिती विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्रातील अतिरेक्याला कोटा येथे रेल्वेत अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांपैकी दोघांनी पाकिस्तानात शस्त्रास्त्रे चालविण्याचे आणि विस्फोटक तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. एका गुप्त सूचनेच्या आधारावर पोलिसांनी एवढी मोठी कामगिरी फत्ते केली.

- Advertisement -

पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचा गट दिल्लीसह आजूबाजूच्या भागांमध्ये स्फोट घडवण्याच्या तयारीत आहेत, विशेषतः गर्दीची ठिकाणं लक्ष्य राहणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष शाखेचे डीसीपी प्रमोद कुमार कुशवाहा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत गुप्तपणे तपास करत अतिरेक्यांना अटक केली. या सहा अतिरेक्यांकडून शस्त्रांसह काही विस्फोटक जप्त करण्यात आले आहेत.

दहशतवादविरोधी कामगिरीचे हे मोठे यश मानले जाते आहे. समीर, लाला, जिशान कमर, ओसामा, जान मोहम्मद अली शेख आणि मोहम्मद अबू बकर अशी अतिरेक्यांची नावं आहेत.

मस्कतमार्गे पोहोचले पाकिस्तानात

- Advertisement -

दिल्ली पोलिसांच्या हाती सर्वात आधी महाराष्ट्रात राहणारा समीर नावाचा अतिरेकी लागला. कोटामध्ये रेल्वेतून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर दोघांना दिल्लीतून अटक केली गेली. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातून तीन व्यक्तींना अटक केली. यातील दोन अतिरेकी एप्रिल महिन्यात मस्कतला गेलेले होते. तेथून जहाजातून त्यांना पाकिस्तानात नेण्यात आले. एका निर्जनस्थळी त्यांना स्फोटकं बनवण्यासोबतच शस्त्रास्त्र हाताळण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. हे दोघंही सुमारे १५ दिवस पाकिस्तानात होते. प्रशिक्षणानंतर मस्कत आणि तिथून ते भारतात परतले. मस्कतमधून जाताना या दोघांच्या ग्रुपमध्ये बांग्ला बोलणारे साधारण १४ ते १५ व्यक्तीदेखील होते. त्यांनाही पाकिस्तानात दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि हेच व्यक्ती परत आल्यानंतर स्लीपर सेल म्हणून काम करत असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

दहशतवाद्यांना भारत-पाक सीमेच्या अत्यंत नजीकच्या भागातून हाताळण्यात आल्याचीही बाब पुढे आलीय. प्रशिक्षण देण्यात आलेल्यांपैकी एका पथकाचं नियंत्रण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याकडे होतं. सीमेपलिकडून मिळणारी शस्त्रं भारतातल्या वेगवेगळ्या शहरांत लपवण्याचं काम या टीमकडे होतं. महाराष्ट्रातला समीर आणि उत्तर प्रदेशातला लाला नावाचा व्यक्ती या ग्रुपचे सदस्य आहेत.

पोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी सणासुदीच्या दिवसांत बॉम्बस्फोट करण्यासाठी दुसऱ्या ग्रुपकडे भारतातील प्रमुख शहरांमधील महत्त्वाची ठिकाणं निश्चित करण्याची जबाबदारी होती.

हेही वाचा : दिल्ली, महाराष्ट्र, यूपीतून ६ दहशतवाद्यांना अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

- Advertisement -