(Thackeray about Mahayuti) मुंबई : राज्यात गुलियन बॅरी सिंड्रोमने (GBS) कहर माजवला आहे. हा एक गंभीर आजार राज्यात वाऱ्यासारखा पसरला आहे. महाराष्ट्रात ही अशी आरोग्यविषयक आणीबाणी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी गेले आहेत. कोरोनाप्रमाणे या आजाराचा प्रसारही चीनमधूनच झाला आहे आणि भारतावर त्या हल्ल्याचा प्रभाव दिसू लागला आहे. राज्यावर हे आरोग्यविषयक संकट कोसळले असताना सरकार आपापसातील हेवेदावे, मान-अपमानामुळे कोमात गेल्याची लक्षणे आहेत, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (Uddhav Thackeray criticizes the state government regarding GBS)
जीबीएस आजाराचे एकट्या पुण्यातच सव्वाशे रुग्ण आहेत. त्यातील शंभरवर रुग्ण पाच किलोमीटरच्या परिघातील आहेत. त्या आजाराने ग्रासलेले 14 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. जीबीएसचा पहिला हल्ला पुण्यावर झाला आहे. त्यामुळे पुण्याची जनता भयभीत होणे स्वाभाविक आहे. कोयता गँगच्या दहशतीने पुणे आधीच भीतीच्या सावटाखाली आहे. त्यात हा जीबीएस आजाराचा कहर झाल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात नमूद केले आहे.
हेही वाचा – Guillain Barre Syndrome : पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 127 वर; सिंहगड परिसर ठरतोय हॉटस्पॉट!
महाराष्ट्रात सध्या या गंभीर आजाराने पुण्याशिवाय सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये हातपाय पसरले आहेत. सोलापुरात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या 110च्या पुढे गेली आहे. परिस्थिती एवढी गंभीर असली तरी महाराष्ट्रातील सरकार स्वतःच या आजाराने ग्रस्त असल्याप्रमाणे वागत आहे. सरकारच्या हातापायाला आणि मेंदूलाही मुंग्याच आल्या आहेत आणि सरकारचा मेंदू काम करेनासा झाल्याची लक्षणे दिसत आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.
अजित पवारांवर निशाणा
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली आणि सांगितले, ‘‘हा आजार संसर्गजन्य नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी.’’ अजित पवार हे वैद्यकीय डॉक्टर नाहीत व राज्याचे आरोग्यमंत्री आबिटकर हेसुद्धा याबाबत अगाध ज्ञानी आहेत. आजार संसर्गजन्य नाही. मग एकाच परिघात तो वाऱ्यासारखा पसरला कसा? चीनमधून देखील भारतात पसरला कसा? असे सांगत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळात याबाबत जो तो आपले ज्ञान पाजळत आहे, पण त्या आजाराबाबत सत्य हेच आहे की, हा दुर्मीळ आजार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Thackeray about Mahayuti: Uddhav Thackeray criticizes the state government regarding GBS)
हेही वाचा – Sanjay Raut : ठाकरे-भाजपा एकत्र येणार, चंद्रकांत पाटलांशी होतेय जवळीक; नेमकं काय म्हणाले राऊत?