Homeमहाराष्ट्रRahul Narwekar : नार्वेकर बिनविरोध विधानसभा अध्यक्ष, ठाकरे गटाचा बहिष्कार, काँग्रेससह पवार...

Rahul Narwekar : नार्वेकर बिनविरोध विधानसभा अध्यक्ष, ठाकरे गटाचा बहिष्कार, काँग्रेससह पवार गटाकडून स्वागत

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अध्यक्ष निवडीचा मांडलेला प्रस्ताव बहुमताने मंजूर होताच हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. मात्र अध्यक्ष निवडीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बहिष्कार घालत सभागृहाबाहेर जाणे पसंत केले. तर सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी अ‍ॅड. नार्वेकर यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यामुळे विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाआघाडीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले होते.

मुंबई : 15 व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे कुलाबा विधानसभा मतदारसंघातील आमदार अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांची आज, सोमवारी (9 डिसेंबर) अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षाकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल न झाल्याने नार्वेकर यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. (Thackeray faction boycotts unopposed election of Rahul Narvekar as Assembly Speaker but welcomes it from Congress and Pawar factions)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अध्यक्ष निवडीचा मांडलेला प्रस्ताव बहुमताने मंजूर होताच हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसर्‍यांदा विराजमान होणारे नार्वेकर हे काँग्रेसचे बाळासाहेब भारदे यांच्यानंतरचे दुसरे अध्यक्ष ठरले आहेत. अध्यक्ष निवडीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बहिष्कार घालत सभागृहाबाहेर जाणे पसंत केले.

- Advertisement -

विधानभवन परिसरात ठाकरे गटाच्या नेत्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला, तर सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी अ‍ॅड. नार्वेकर यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यामुळे विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाआघाडीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले होते.

राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 9 डिसेंबरचा दिवस निश्चित केला होता. त्यानुसार रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. या पदासाठी महायुतीकडून राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. महायुतीकडील बहुमत लक्षात घेऊन महविकास आघाडीने या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे केवळ नार्वेकर यांच्या नावाची घोषणा होण्याची औपचारिकताच शिल्लक होती.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra EVM Issue : महाराष्ट्रातील ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची आकडेवारी जुळली; निवडणूक आयोगाचे म्हणणे काय

सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच कालिदास कोळंबकर यांनी अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडण्याची परवानगी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर हा प्रस्ताव मतास टाकला असता तो आवाजी मतदानाने आणि एकमताने मंजूर करण्यात आला. प्रस्ताव मंजूर होताच राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी अधिकृत निवड झाल्याची घोषणा कोळंबकर यांनी केली.

या घोषणेनंतर प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस नेते नाना पटोले, नितीन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी नार्वेकर यांना अध्यक्षस्थानी आसनस्थ करत त्यांना शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर राज्यात 2022 मध्ये सत्तांतर झाले.

त्यावेळी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यावर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड केली होती. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर महायुतीकडून विधानसभा अध्यक्ष म्हणून पुन्हा नार्वेकर यांना संधी देण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे दुसर्‍यांदा अध्यक्षपद भूषविणारे नार्वेकर हे दुसरे अध्यक्ष ठरले आहेत. बाळासाहेब भारदे यांनी पहिल्यांदा 1962, पुन्हा 1967 असे दोन वेळा आणि सलग दहा वर्षे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद भूषविले होते.

हेही वाचा – Assembly Special Session 2024 : संख्या जरी कमी असली तरी…; विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचे विरोधकांना आश्वासन

पक्षीय भेदभाव दूर ठेवून कार्य करा – कोळंबकर

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड होताच हंगामी अध्यक्ष कोळंबकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. विधानसभा अध्यक्षपद संविधानिकदृष्ठ्या उच्च दर्जाचे आहे. या पदावर काम करणार्‍या व्यक्तीने पक्षीय भेदभाव दूर ठेवून नि:पक्षपातीपणे कार्य करावे असे संविधानाला अपेक्षित आहे. त्यानुसार या सभागृहात नि:स्पृह पद्धतीने कार्य करून सभागृहाची प्रतिष्ठा वाढवाल, अशी अपेक्षा कोळंबकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा लाभला असून सभागृहाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नार्वेकर यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी कोळंबकर यांनी शुभेच्छा दिल्या.

एफडीआयमध्ये महाराष्ट्र प्रथम – सी. पी. राधाकृष्णन

महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर औद्योगिक राज्य असून देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये राज्याचे 14 टक्क्यांपेक्षा अधिक योगदान आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) महाराष्ट्र देशात प्रथम स्थानी होता, तसेच 2024-25 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 1,13,236 कोटी रुपये इतक्या थेट परकीय गुंतवणुकीसह महाराष्ट्राने देशात पुन्हा प्रथम स्थान प्राप्त केले आहे. ही गुंतवणूक मागील वर्षाच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले.

16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 ते 21 डिसेंबर या काळात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी सोमवारी याबाबतची घोषणा केली.

हेही वाचा – Maharashtra Winter Session : अधिवेशनाची तारीख ठरली; एका आठवड्यात गुंडाळणार कामकाज

सभागृहाची शिस्त पाळावी लागेल – अ‍ॅड. राहुल नार्वेकर

देशासह राज्यातील नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल आणि संसदीय लोकशाहीला बळकट करायचे असेल तर सभागृहात बेशिस्तीचे वर्तन होणे चुकीचे आहे. त्यामुळे सर्वांना सभागृहाचे नियम आणि शिस्त पाळावीच लागेल, असे म्हणत विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकरांनी सर्वपक्षीय आमदारांचे कान टोचले.

मी पुन्हा येईन न म्हणता येणारे अध्यक्ष – देवेंद्र फडणवीस

मी पुन्हा येईन न म्हणता पुन्हा येणारे अध्यक्ष, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनपर भाषणादरम्यान काढले. राहुल नार्वेकर हे सर्वाधिक चर्चेत राहिलेले अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे त्यांनी एक नवा विक्रम केला आहे. राहुल नार्वेकर अतिशय तरुण वयात विधानसभा अध्यक्ष झाले, तर पुन्हा एकदा अध्यक्ष बनत त्यांनी रेकॉर्ड केल्याचे फडणवीस म्हणाले.

विरोधकांची संख्या चिंताजनक – एकनाथ शिंदे

दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरील चर्चेच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जोरदार टोलेबाजी रंगली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वाट मोकळी करून दिल्याने नार्वेकर अध्यक्ष झाल्याचा टोला लगावला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या चिंताजनक असून असे व्हायला नको होते, अशी टीका महाआघाडीला उद्देशून केली.

हेही वाचा – Aaditya Thackeray : बेळगावला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी; ठाकरेंचे सरकारवरही ताशेरे


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -