घरताज्या घडामोडीखात्यांचा तिढा सुटेना; ठाकरे सरकार नवीन खाती निर्माण करणार?

खात्यांचा तिढा सुटेना; ठाकरे सरकार नवीन खाती निर्माण करणार?

Subscribe

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते कुणाला कुठले खाते मिळणार याकडे. मात्र विस्तार झाला असला तरी खाते वाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. त्यामुळे खाते वाटपाचा हा तिढा सोडवण्यासाठी आता ठाकरे सरकारने काही नवीन खाती निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या नव्या खात्यामध्ये मेट्रो मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, तिर्थ क्षेत्र विकास मंत्रालय आणि मुख्यमंत्री मंत्रालय या चार नव्या खात्याचा समावेश असण्याची शक्यता असून या खात्यांवर चर्चा झाली आहे. त्यामुळे मंत्र्यांना खाती वाटप करताना या खात्यांचा देखील समावेश असणार, अशी माहिती देखील मिळत आहे.

म्हणून या खात्यांची निर्मिती होण्याची शक्यता

सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि नागपूरमध्ये मेट्रोची कामे सुरू असल्याने मेट्रो मंत्रालय खाते तयार करून या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी काम केले जाणार आहे. तर वाणिज्य मंत्रालयाची निर्मिती करून वस्तू व सेवा कर आणि इतर कर विषयक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात तिर्थ क्षेत्र विकासासाठी मोठी अर्थसंकल्पीय तरतूद केली जाते, त्यामुळे त्यासाठी तिर्थक्षेत्र मंत्रालय बनवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या कार्यालयातील कामकाजासाठी मुख्यमंत्री मंत्रालय हे नवीन खाते देखील बनवण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

तिढा सुटत नसल्याने खाते वाटप रखडले

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिन्ही पक्षांमध्ये अजूनही खातेवाटपावरून एकमत झाले नसल्याने शुक्रवारी (आज) होणारे खाते वाटप देखील उद्यावर गेल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही कोणत्या मंत्र्याला कोणते खाते देण्यात येणार याची यादी देखील राज्यपालांकडे गेली नाही. त्यामुळे जर शनिवारी म्हणजेच उद्या खातेवाटप करायचे असल्यास आज रात्री उशिरापर्यंत तरी खाते वाटपावर तोडगा निघाला पाहिजे अन्यथा हे खातेवाटप उद्याही होऊ शकणार नाही. दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी कृषी आणि ग्रामविकास यापैकी एक खाते काँग्रेसकडे रहावे, असे सांगितल्यामुळे खाते वाटपाचा तिढा आणखी वाढला आहे. त्यामुळे आता उद्या तरी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना खातेवाटप होणार का? की त्यांना सोमवारपर्यंत वाट पहावी लागेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -