घरताज्या घडामोडीपुण्याचा विकास ठाकरे सरकारच करणार, भाजप-राष्ट्रवादी होर्डिंग वॉरमध्ये शिवसेनेची एन्ट्री

पुण्याचा विकास ठाकरे सरकारच करणार, भाजप-राष्ट्रवादी होर्डिंग वॉरमध्ये शिवसेनेची एन्ट्री

Subscribe

शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या होर्डिंगवर पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारच करणार असल्याचे लिहिले आहे.

पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारच करणार अशा संदेशाची बॅनरबाजी शिवसेनेकडून पुण्यामध्ये करण्यात आली आहे. आगामी पुणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सध्या पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस होऊन गेला या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात होर्डिंग्ज वॉर सुरु होता यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली होती. ही चर्चा थांबत नाही, तोच शिवसेना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे होर्डिंग पुण्यात लावले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात होर्डिंग लावण्यात आले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या होर्डिंगवरुन राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या होर्डिंगच्या शेजारी आणि मध्ये शिवसेनेकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत. शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या होर्डिंगवर पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारच करणार असल्याचे लिहिले आहे. यामुळे पुण्यातील विकासावरुन होणारा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. पुण्यातील विकास कोण करतंय यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या बॅनरवरील घोषवाक्ये

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी होर्डिंग लावले होते. या होर्डिंगवर कारभारी लयभारी, कर्तव्य प्रतिदक्ष प्रत्येक कामावर जातीने लक्ष, पुण्यनगरिचा विश्वास, दादा म्हणजे विकास अशी घोषवाक्य लिहिण्यात आली होती. यामुळे भाजप-राष्ट्रवादीमध्ये होर्डिंगवॉर रंगला असल्याचे पाहायला मिळत होते आता त्यामध्ये शिवसेनेनं एन्ट्री घेतली असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपकडून होर्डिंगबाजी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली होती. यावेळी होर्डिंगवर विकास पुरुष असे ठळक अक्षरात लिहिण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. पुणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तयारी सुरु केली असून काही दिवसांपुर्वीच राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -