‘सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग, आता तरी चाचण्या वाढवा’; फडणवीसांचे पत्र

Devendra Fadnavis tour nashik

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत सर्वाधिक संसर्गाचा दर सप्टेंबर महिन्यात वाढलेला आहे. ६ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज नक्कीच आहे. पण ६ महिने घालविल्यानंतर किमान आता तरी कोरोना चाचण्या वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करावे, अशा मागणीचे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. याआधी देखील फडणवीस यांनी अनेकवेळेला पत्र लिहून राज्य सरकारकडे कोरोनाच्या उपाययोजनांसंबंधी आपले विचार मांडले होते. तसेच चाचण्या वाढविण्यासंबंधीचा आग्रह त्यांनी पहिल्या दिवसापासून लावून धरलेला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सप्टेंबर महिन्यात ऑगस्टच्या तुलनेत केवळ २६ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. जुलैमध्ये सरासरी प्रतिदिन ३७,५२८, ऑगस्टमध्ये प्रतिदिन ६४,८०१ तर सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ८८,२०९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारकडून चाचण्या वाढविण्यासंबंधी वारंवार सूचना दिल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चाचण्यांची संख्या दीड लाखांपर्यंत वाढविण्याचा विचार बोलून दाखविला आहे. तरिसुद्धा दिवसागणिक चाचण्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे.”

या पत्राद्वारे फडणवीस यांनी आतपर्यंतचा कोरोना संसर्गाचा दर देखील पत्राद्वारे उघड केला आहे. त्यात ते म्हणाले की, ऑगस्टमध्ये ४२ टक्के चाचण्या वाढविल्यानंतर संसर्गाचे प्रमाण १२ टक्क्यांवरुन १८ टक्क्यांवर आले होते. मात्र सप्टेंबरमध्ये संसर्गाचे प्रमाण ४ टक्क्यांनी वाढले आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात १२ हजार ७९ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले असल्याचेही फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

महिना        संसर्ग दर

एप्रिल        ८.०४ टक्के
मे            १८.७ टक्के
जून          २१.२३ टक्के
जुलै          २१.२६ टक्के
ऑगस्ट       १८.४४ टक्के
सप्टेंबर       २३.३७ टक्के