ठाकरे गटाच्या नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांसोबत आज डिनर डिप्लोमसी, शिंदेगट मात्र अनभिज्ञ

नाशिक : शहरातील बारा माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगलेली असताना या गटातील पदाधिकारी मात्र याविषयी अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठल्या नगरसेवकांची सोमवारी (दि.28) डिनर डिल्पोमसी रंगते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाशिकमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे उध्दव ठाकरे गट असेल किंवा इतर पक्षातील नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यादृष्टीने नाशिकमध्ये सातपूर, सिडको, नाशिकरोड व पाथर्डी भागातील काही माजी नगरसेवक हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे स्वत: सोमवारी रात्री जेवण करणार असून, त्यानंतर मंगळवारी प्रवेश सोहळा होणार असल्याचे बोलले जाते. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या नाशिक दौर्‍यावर असल्यामुळे त्यांच्या भेटीनिमित्त नाशिकमधील पदाधिकार्‍यांनी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे शिंदे गटात जाणारे माजी नगरसेवक हे फक्त उध्दव ठाकरे गटाचेच असतील असे नाही तर इतर पक्षातीलही असू शकतात, असा अंदाज वर्तवला जातो. त्यात माजी पदाधिकार्‍यांचा समावेश असल्याचे बोलले जात असले तरी माजी महानगरप्रमुखांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत ‘डिनर डिप्लोमसी’ करण्यासाठी नक्की कोण जाणार आहे, याविषयी सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे.

पक्षांतर्गत संशय वाढला

नेमके कुठले माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार आहेत, याविषयी ठामपणे कुणीच कुणालाही माहिती देत नसल्याने रविवारी दिवसभर एकमेकांविषयी संशय घेवून पक्षांतर्गत संशय बळावल्याचे दिसून आले. ज्यांच्याविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती, असे माजी नगरसेवक सतत संपर्कात आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेवून सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत होते. त्यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी एकदम निर्धास्त असल्यासारखे वावरताना दिसले. इतकेच नाही तर उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी नाशिकमधील पदाधिकार्‍यांची भेट घेवून असा काही प्रकार घडणार आहे का, याविषयी माहिती घेतली. त्यांनाही ही अफवा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शिंदे गटाच्या गळाला कुठले मासे लागले हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. मंगळवारी त्यांचा प्रवेश सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रंगणार असला तरी ‘डिनर डिप्लोमसी’मध्ये कोण सहभागी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. यात मनसे, भाजपच्या काही माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचीही चर्चा रविवारी शहरात सुरु होती.

नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याबाबत मुंबईतून आमच्यापर्यंत कुठलाही संदेश आलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जेवणाचा कार्यक्रम आमच्याकडून आखण्यात आलेला नाही. त्यामुळे याविषयी सध्यातरी काही सांगता येणार. कुठले नगरसेवक पक्षात प्रवेश करणार आहेत, याविषयी लवकरच खुलासा होईल, ही अंतर्गत बाब असल्यामुळे त्याविषयी उघडपणे सांगू शकत नाही. : प्रवीण तिदमे, महानगर प्रमुख, शिंदे गट