चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गट आग्रही; संजय राऊतांची माहिती

चिंचवडची जागा शिवसेनेकडे (ठाकरे गट) असावी आणि लढवावी असे आमचे मत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, 'विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांचीशी चर्चा केली.

चिंचवडची जागा शिवसेनेकडे (ठाकरे गट) असावी आणि लढवावी असे आमचे मत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, ‘विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांचीशी चर्चा केली. त्यावेळीही आम्ही आमची भूमिका मांडली’, असेही संजय राऊत यांनी म्हटले. (Thackeray group insists for Chinchwad by election Information about MP Sanjay Raut)

आज शिवसेना भवनात कसबा आणि चिंचवड येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीसंदर्भात आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात दोन पोटनिवडणुका होणार आहेत. दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदारांचे निधन झालेले आहे. त्यामुळे तेथील जागा रिक्त असल्याने तेथे निवडणुका होणार आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेचा आग्रह आहे की, चिंचवडची पोटनिवडणूक आम्ही लढावी. चिंचवडमधल्या मतदारांचाही तो हट्ट आहे”.

त्याशिवाय, “ही निवडणूक आम्ही लढावी यासाठी काल रात्री विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांचीशी चर्चा केली. त्यावेळीही आम्ही आमची भूमिका मांडली. कसबा मतदारसंघात राष्ट्रवादी किंवा काँग्रेसने कसे लढायचे हे आपण ठरवू. पण चिचंवडची जागा ही शिवसेनेकडे असावी. मागे झालेल्या निवडणुकीत राहुल कलाटे हे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे विद्यमान गटनेते हे अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते. त्यावेळी त्यांनी चांगली झूंज देत आणि लाखांच्यावर मत मिळवली. तसेच, यावेळी सुद्धा ती जागा शिवसेनाच (ठाकरे गट) जिंकेल”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

“महाविकास आघाडी आहे. त्यामुळे चर्चेतुन प्रश्न सुटणार आहे. आम्हीही अनेकदा बऱ्याच जगांवर दावा करत असतो. अजित पवार यांचेही याबद्दल काही म्हणणे होते ते, आम्ही ऐकून घेतले. पण चिंचवडची जागा शिवसेनेकडे असावी आणि लढावी हे आमचे मत आहे”, असेही राऊत म्हणाले.


हेही वाचा – दीपक केसरकर म्हणतात आदित्य ठाकरे यांना अनुभव नाही; वाचा नेमके प्रकरण काय?