
भाजप शिवसेना शिंदे गटाला सावत्रपणाची वागणूक देत असल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. राऊत म्हणाले की, फुटलेल्या गटातही दोन गट पडले आहेत. शिंदे गटात नाराजी आहे, असं म्हणत राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. ( Thackeray group leader Sanjay Raut criticized Shinde Group and BJP )
राऊत म्हणाले की, आम्ही भाजपसोबत असताना आमच्यासोबत जे झालं तेच आता शिंदे गटासोबत होत आहे. कीर्तिकर यांनी जे सांगितलं तिच भूमिका शिवसेनेची आधीपासून होती म्हणून आम्ही भाजप सोडलं. त्यांनी आपला शब्द पाळला नाही, सत्तेत असताना निधी मिळू दिला नाही, शिवसेनेच्या नेत्यांची काम रखडून ठेवली आहेत. केंद्रापासून ते महाराष्ट्रापर्यंत शिवसेनेच्या अनेक नेत्यांना अपमानित केलं गेलं, म्हणून महाराष्ट्राच्या आणि पक्षाच्या स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं, राऊत म्हणाले. तसचं भाजप हा अजगर किंवा मगर आहे. त्यांच्यासोबत जे जातात तो त्यांना खाऊन टाकतो, असंही राऊत म्हणाले.
गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात जाऊन भाजपसोबत युतीत जाऊनही आनंदी नसतील, म्हणजे भाजपने आपला मूळ स्वभाव सोडलेला नाही. भाजप त्याच्या घटक पक्षांना सावत्रपणाची वागणूक देतो. आमच्यासोबत जे झालं तेच आता शिंदे गटासोबत होत आहे, असं राऊत म्हणाले.
( हेही वाचा: माझी आतल्या गोटातली माहिती…, निवडणुकांबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य )
कोंबड्या कापायला सुरुवात झालीय
भाजपाने त्यांचा मूळ स्वभाव, भूमिका सोडलेली नाही. ती कायम आहे. कीर्तिकरांसारखा आमचा सहकारी तिथे जाऊनही सुखी नाही, म्हणजे काल मी म्हणालो तसं भाजपाने हा कोंबड्यांचा खुराडा पाळला आहे. आता त्यातली एकेक कोंबडी त्यांनी कापायला सुरुवात केली आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.