राज्याच्या राजकारणात सध्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीची चर्चा आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये चोरिडिया यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे काका- पुतण्याच्या या भेटीनं चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. शरद पवार हे अजित पवारांना का भेटले यामागचं कारण आता राऊतांनी सांगितलं आहे. पहाटेच्या शपथविधीप्रमाणे मागे फिरा, असं सांगण्यासाठी शरद पवार हे अजित पवारांना भेटले असतील, असं म्हणत राज्याच्या राजकारणात लवकरच मोठी उलथापालथ होईल, असा इशाराही राऊतांनी यावेळी दिला. ( Thackeray group leader Sanjay Raut on Sharad pawar and Ajit Pawar meet know the details )
राऊत काय म्हणाले?
भाजप – शिवसेना युती का तुटली यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी दावा केला आहे की भाजपनेच दिलेला शब्द पाळला नाही. 2019 मध्ये एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून युती तोडत असल्याचं म्हटलं होतं. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे माहित नसावं. मोदी कोणाला चुकीची माहिती देत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
2019 मध्ये दुसऱ्यांदा युती तुटली. एकनाथ शिंदे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्यास भाजपने नकार दिला होता. त्यामुळे युती तुटली होती, असा दावा करतानाच त्याच शिंदेंना भाजपने आता मुख्यमंत्री केलं आहे. मोदींनी या घडामोडींवर बोललं पाहिजे.
मुख्यमंत्र्यांना लगावला टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली. यावर आता राऊतांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजारावर टीका करणारे मुख्यमंत्री आजारी पडले आहेत. तुम्ही आराम करायला मुख्यमंत्री झालात की राज्य कारभार करायला? असा खोचक प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.