मुंबई : वाढीव वीज बिल आणि स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आज आक्रमक भूमिका घेत अंधेरी पूर्वेकडील अदानी वीज कंपनी कार्यालयाबाहेर आपल्या कार्यकर्त्यांसह धडक मोर्चा नेला. आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अदानी इलेक्ट्रिक कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर माध्यमांशी संवाद साधत अनिल परब म्हणाले की, नागरिकांच्या प्रश्नांचं समाधान होईपर्यंत स्मार्ट मीटर बसवणं थांबवण्याची विनंती करण्यात आली आहे. (Thackeray group stages protest at Adani Electricity office against increased electricity bills in Mumbai)
अदानी वीजेच्या वाढीव बिलाबाबत संताप व्यक्त करताना अनिल परब म्हणाले की, नागरिकांना वीज बिलाचे ज्या दिवशी पैसे भरायचे असतात, त्या दिवशी पैसे भरले नाही तर त्याची ताबडतोब वीज कापण्यात येईल. हे लोक कार्यालयात बसूनसुद्धा वीज कापू शकतात. आज जसं शेतकऱ्यांना शासनाने कृषीपंपासाठी सवलत दिली आहे. त्याचं वीज बिल मागे पुढे झालं तर त्यांना सांभाळून घेतलं जातं, ही एक चांगली गोष्ट आहे. तसंच मुंबईतील नागरिक हे कष्टकरी आहेत. अदानी कंपनी गरिबांच्या घरात वीज देत आहे. पण उद्या जर या लोकांना वीज बिल भरायला वेळ लागला तर त्यांची वीज ताबडतोब कापली जाते. त्याचबरोबर जे आज स्मार्ट मीटरच्या माध्यमातून बील भरत आहेत, या स्मार्ट मीटरचा खरा खेळ अदानींच्या हेड ऑफीसमधून चालतो, असा आरोप परब यांनी केला.
हेही वाचा – Kurla Bus Accident : येथे ओशाळली माणुसकी, गाडीखाली अडकलेल्या मृत महिलेच्या बांगड्या युवकाने पळवल्या
अनिल परब म्हणाले की, यापूर्वी आपल्या घराच्या बाहेर वीजेचे मीटर लागलेले असायचे. त्यामुळे पूर्वी मीटर चेक करण्यासाठी माणूस येत होतो, तेव्हा त्याला मीटरबाबत प्रश्न विचारता येत होते. पण आता ती सोय राहिलेली नाही. घरात बसून तुम्हाला कळणार देखील नाही की, तुमच्या खिशातून किती पैसे काढून घेतले जात आहेत. त्यामुळे मुंबईतील ग्राहकांची लूट थांबवण्याची जबाबदारी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आणि उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने घेतली आहे. आज आम्ही निवेदन वजा इशारा देण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ घेऊन आलो होतो. हा आमचा मोर्चा किंवा आंदोलनाचा कार्यक्रम नव्हता. पण आज आम्ही त्यांना सांगितलं आहे की, जोपर्यंत स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांचं समाधान होत नाही, ठाकरे गटाने उचललेल्या मुद्द्यांचं समाधान होत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्मार्ट मीटर बसवण्याचं काम थांबवावं लागले. ही गोष्ट त्यांनी मान्य केलेलं आहे. तसेच त्यांनी आम्हाला लेखी लिहून दिलेलं आहे, अशी माहिती परब यांनी दिली.
अनिल परब म्हणाले की, गरिबांच्या खिशातून लूट करण्याचा प्रयत्न अदानी करत होती, ती लूट आता थांबलेली आहे. यासंदर्भात आमचं म्हणणं एवढंच आहे की, एमईआरसीने पब्लिक हिअरींग घेतली पाहिजे. आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. यापूर्वी रिलायन्स आणि बीएसएन असेपर्यंत आमचं आणि आमच्या शाखाप्रमुखांचं म्हणणं ऐकून घेतलं जात होतं. पण आता यांना असं वाटत आहे की, अदानी यांचा मालक असल्यामुळे त्यांना कोणाला काही विचारायची गरज नाही. परंतु मुंबईच्या लोकांच्या हितासाठी शिवसेना बसलेली आहे. अशा प्रत्येक आंदोलनात शिवसेना उतरेल, अशा इशारा अनिल परब यांनी दिली.
हेही वाचा – Nana Patole : परभणीतील घटना म्हणजे संविधानाचा अवमान; नाना पटोलेंनी केली ही टीका