Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशThackeray group Vs BJP : देशातील सार्वजनिक संपत्तीचे मालक अदानी, ठाकरे गटाचा...

Thackeray group Vs BJP : देशातील सार्वजनिक संपत्तीचे मालक अदानी, ठाकरे गटाचा हल्लाबोल

Subscribe

भारतात ‘बेकारी’चा स्फोट झाला आणि राज्यकर्ते निवडणूक विजयाच्या उत्सवात दंग आहेत. त्यांनी महाराष्ट्र जिंकला. त्या महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांत पाच हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारांनी वैफल्याच्या झटक्यात जीवन संपवले, या वास्तवाकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

(Thackeray group Vs BJP) मुंबई : गौतम अदानी या एका व्यक्तीभोवती देशाची अर्थव्यवस्था आणि उद्योग क्षेत्र घोटाळत आहे, पण संपूर्ण अदानी समूहात देशभरात दोन हजार लोकांनाही रोजगार मिळू शकलेला नाही आणि देशातील सार्वजनिक संपत्तीचे मालक अदानी यांना बनवले गेले आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे. (Thackeray group criticizes Adani over unemployment issue)

स्वातंत्र्यानंतर टाटा, बिर्ला, बजाज, प्रेमजी, वाडिया, नारायण मूर्ती अशा अनेकांनी देशात गुंतवणूक केली आणि त्यातून मोठा रोजगार निर्माण झाला. पंडित नेहरू यांनी अनेक सार्वजनिक उपक्रमांची पायाभरणी करून त्यातून रोजगार दिला. मोदी काळात हे सर्व सरकारी उपक्रम मोडीत काढले आहेत, अशी जहरी टीका सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray group on unemployment : अल्पउत्पन्नवाल्यांना फुकट राशन देणार? ठाकरे गटाचा मोदींना सवाल

देशात आता रोजगार, नोकऱ्या निर्माण होत नाहीत. कारण उद्योगधंद्याला पोषक वातावरण देशात नाही. ईडी, सीबीआय, भाजपा, इन्कम टॅक्सच्या दहशतीमुळे देशातील 5 लाखांवर मध्यम उद्योजकांनी पलायन केले आणि अन्य देशांत जाऊन त्यांनी गुंतवणूक केली. त्यामुळे मोठा रोजगार बाहेर गेला, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. मुंबईसारख्या सर्वाधिक रोजगार देणाऱ्या औद्योगिक शहराचे महत्त्व कमी करण्यात आले. महाराष्ट्रासारख्या राज्यात उद्योग येऊच नयेत यासाठी अथक परिश्रम हे लोक घेताना दिसत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, पंजाबात, केरळात आज नोकऱ्यांची वानवा आहे आणि मुंबईसह महाराष्ट्रातही नोकऱ्यांच्या नावाने ठणठण गोपाळा आहे, असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक गरिबी, रोजगार, महागाईवर कधी बोलताना दिसत नाहीत. कारण सर्वच क्षेत्रांतला रोजगार संपला. ज्या प्रकारचे स्फोटक आणि भयग्रस्त वातावरण मोदी काळात तयार झाले, त्याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसला. त्यात जम्मू-काश्मीर, उत्तरेकडील तसेच ईशान्येकडील राज्ये प्रामुख्याने आहेत, असे सांगतानाच, मोदी हे बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवतात. हवाई चप्पल वापरणारादेखील यापुढे ‘हवाई’ प्रवास करेल अशी भाषणे ठोकतात. प्रत्यक्षात जमिनीवरील स्थिती वेगळी आणि भयावह असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : विधानसभेचे निकाल मान्य नसले तरी…; मुख्यमंत्रि‍पदाबाबत काय म्हणाले राऊत?

युक्रेन, इराक, इराण, अफगाणिस्तानसारख्या देशांत युद्ध परिस्थितीमुळे बेकारी तसेच उपासमारीचे संकट आहे. भारतात असे काहीच नसताना ‘बेकारी’चा स्फोट झाला आणि राज्यकर्ते निवडणूक विजयाच्या उत्सवात दंग आहेत. त्यांनी महाराष्ट्र जिंकला. त्या महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांत पाच हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारांनी वैफल्याच्या झटक्यात जीवन संपवले, या वास्तवाकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा विजयानंतर भाजपा आणि त्यांच्या महायुतीत आनंदी आनंद आहे. महाराष्ट्रातील विजयाचे श्रेय सगळ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. त्यात शिंदे सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसदेखील आहे. लोकांनी मोदी यांच्याकडे पाहून मते दिली, असे या कंपूचे म्हणणे आहे. हा आनंद उत्सव मोदी समर्थकांनी दिल्लीतही साजरा केला, पण देशातील युवक, शेतकरी यांच्या जीवनात खरेच आनंद निर्माण करण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले आहेत काय? असा थेट सवाल ठाकरे गटाने केला आहे. (Thackeray group Vs BJP: Thackeray group criticizes Adani over unemployment issue)

हेही वाचा – ECI vs Congress : शेवटच्या तासात मतदानाचा टक्का कसा वाढला? आयोगाने दिले हे स्पष्टीकरण


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -