घरमहाराष्ट्रठाकरे सरकार उत्तीर्ण

ठाकरे सरकार उत्तीर्ण

Subscribe

१६९ आमदार ,भाजपचा सभात्याग, मनसे, एमआयएम आणि माकपचे चार आमदार तटस्थ

गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षातील महत्वाची परीक्षा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नवनिर्वाचित सरकारने बहुमताने उत्तीर्ण केली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने १६९ मते आपल्या पारड्यात पाडत हा सामना पहिल्याच फटक्यात जिंकला. तत्पूर्वी विश्वासदर्शक ठरावासाठी बोलवलेल्या विशेष अधिवेशनाबरोबरच हंगामी अध्यक्ष निवडीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप नोंदवल्याने भाजप आमदारांनी सभागृहात प्रचंड गदारोळ घातला.

भाजप आमदारांनी अध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत धाव घेत गोंधळ घालत घोषणाबाजी केली. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेले आक्षेप हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावताच भाजप आमदारांनी सभात्याग केला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खुल्या पध्दतीने झालेल्या मतदानात १६९ आमदारांच्या पाठिंब्याने ठाकरे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव बहुमताने मंजूर झाला. मनसे, एमआयएम आणि माकपचे मिळून ४ आमदार तटस्थ राहीले तर भाजपने सभात्याग केल्याने ठाकरे सरकारविरोधात शून्य मतांची नोंद झाली. भाजप आणि मित्रपक्ष असे ११९ आमदार असूनही भाजपसोबतचे फुटलेले ४ आमदार कोण अशी चर्चा विधीमंडळात सुरू आह

- Advertisement -

मनसे, एमआयएम आणि माकपच्या चार आमदारांनी विश्वासदर्शक ठरावात तटस्थ भूमिका घेतली. विधासनभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सुरु झालेल्या राजकीय अस्थिरतेला या विश्वासदर्शक ठरावानंतर विराम मिळाला. या सर्व घडमोडींना छेद देत महाराष्ट्र विकास आघाडीच्या बॅनरखाली एकत्र आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सभागृह नेते म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करून गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्री पदाबरोबरच गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार उद्धव ठाकरे यांना ३ डिसेंबरपूर्वी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्याआधीच विश्वासदर्शक ठराव पारित करण्याचा निर्णय घेत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन काल शनिवारी बोलवण्यात आले होते.

दुपारी दोन वाजता सुरू व्हायच्या कामकाजावर आक्षेप घेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पॉईंट ऑफ प्रोसिजर अन्वये अधिवेशनच बेकायदा असल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजप आमदारांनी सभागृहात एकच गोंधळ सुरु केला. दादागिरी नही चलेंगी अशा घोषणा देत सर्व भाजप आमदारांनी सभागृहाच्या मध्यभागी येत सभागृहाचे कामकाज थांविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्षाचा हा दावा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावला. मात्र त्यानंतरही सभागृहातील भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा धारण केला.

- Advertisement -

या गोंधळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांचा मंडळाचा परिचय करुन दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरे सरकाला बहुमत सिद्ध करण्याचा प्रस्ताव मांडण्याची सूचना करतानच फडणवीस यांनी मंत्र्यांनी घेतलेल्या शपथेवर आक्षेप नोंदवला. थोर पुरुषांचा शपथेमध्ये केला जाणारा उल्लेख बेकायदा असल्याचा फडणवीस यांचा आक्षेप हंगामी अध्यक्ष वळसेपाटील यांनी फेटाळला तेव्हाही भाजपचा आमदारांनी सभागृहात आक्रमक पवित्रा धारण केला. भाजपचे आमदार पुन्हा अध्यक्षांच्या आसनापुढे जमले आणि जोरदार घोषणा देत त्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. अध्यक्षांनी विश्वासदर्शक ठरावाचा प्रस्ताव वाचून दाखवण्यास सुरूवात करतात भाजपच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला.

हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विश्वासदर्शक ठरावावरील मतदान हे खुल्या पध्दतीने घेण्याचे जाहीर करत सभागृहाचे दरवाजे बंद करण्याच्या सूचना केल्या. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर विश्वास व्यक्त करणारा प्रस्ताव सभागृहात मांडला. या प्रस्तावास राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, जयंत पाटील, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. यानंतर सभागृहातील आमदारांना उभे राहून गणसंख्येद्वारे मत नोंदवण्याचे सूचित करण्यात आले. यात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, सपा, शेकाप, बविआ आणि अपक्ष अशा एकूण १६९ आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केल्याचे दिलीप वळसेपाटील यांनी जाहीर केले तेव्हा सत्ताधारी आमदारांनी या घोषणेचे जोरदार स्वागत केले. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माकपचे प्रत्येकी एक आणि एमआयएमचे दोन असे चार सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे हा ठराव उद्धव ठाकरे सरकारने १६९ विरुद्ध ० मतांनी जिंकल्याचे पीठासीन अधिकार्‍यांनी जाहीर केले. मतदान पूर्ण होताच महाराष्ट्र विकास आघाडीच्या सर्व आमदारांनी विजयी जयघोषणांनी सभागृह दणाणून सोडला.

उद्धव-देसाईंना मतदान नाही
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या उद्धव ठाकरेंच्या बहुमत चाचणीत स्वत: उद्धव ठाकरे यांना मतदान करता आलेले नाही. ते विधान सभेचे सदस्य नसल्याने त्यांना मतदान करता आलेले नाही. त्यांच्याबरोबर सुभाष देसाई यांना देखील यावेळी मतदानात भाग घेता आला नाही. देसाई हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. तर दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती हंगामी अध्यक्ष पदी निवड केल्याने त्यांना ही मतदान प्रक्रियेत मतदान करता आलेले नाही.

महाराष्ट्र महाविकास आघाडीकडून व्हीप
तत्पूर्वी, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने आपापल्या पक्षाच्या आमदारांसाठी व्हीप जारी केला होता. ठाकरे मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश तिन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या आमदारांना दिले होते.

खरर्गे, सुप्रिया प्रेक्षक गॅलरीत
या बहुमत चाचणीकडे उभ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे महाराष्ट्र विकासआघाडीचे अनेक बडे नेते यावेळी सभागृहातील गॅलरीत आवर्जून उपस्थित होते. यात काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकाअर्जून खरर्गे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खा.राजन विचारे, माजी मंत्री अरविंद सावंत, सुनील तटकरे असे अनेक नेते प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -