Homeमहाराष्ट्रThackeray vs Mahayuti : हेच राज्यकर्त्यांचे दाखवायचे दात, उद्धव ठाकरे यांची टीका

Thackeray vs Mahayuti : हेच राज्यकर्त्यांचे दाखवायचे दात, उद्धव ठाकरे यांची टीका

Subscribe

‘गाव तेथे एसटी आणि रस्ता तिथे बस’ हे एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य असले तरी ‘महामंडळ तिथे घोटाळे आणि घोटाळ्यातून खोके’ हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे ब्रीदवाक्य बनले आहे.

(Thackeray vs Mahayuti) मुंबई : एसटीच्या प्रवास भाड्यात झालेल्या जबर दरवाढीमुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांचे खायचे दातच पुन्हा एकदा समोर आले आहेत. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या वेळी ‘लाडकी बहीण’, ‘लाडके भाऊ’ वगैरे योजनांचा धुरळा उडवून मागाल ते फुकट देण्याची तयारी हेच राज्यकर्ते दाखवीत होते. अगदी मतदारांसाठी कमरेचेही काढून देण्याची तयारी होती. अर्थात ते स्वतःच्या घरातून किंवा स्वतःच्या खिशात हात घालून कधीच देणार नव्हते. सरकारी तिजोरीची लूट करायची आणि ‘हपापाचा माल गपापा’ म्हणतात, त्याप्रमाणे आपण कसे दानशूर हरिश्चंद्र वगैरे आहोत, असे भासविण्याचा प्रयत्न करायचा. ही नौटंकी म्हणजेच सध्याच्या राज्यकर्त्यांचे दाखवायचे दात आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

निवडणुका संपल्या, सत्ता मिळाली, खुर्च्या मिळाल्या, बंगल्यांचे वाटप झाले, लाल दिव्यांच्या गाड्या मिळाल्या. त्यामुळे राज्यकर्त्यांचे खायचे दात समोर येऊ लागले आहेत. एसटीच्या भा़ड्यात शुक्रवारपासून झालेली तब्बल 15 टक्क्यांची दरवाढ हे त्याचेच ज्वलंत उदाहरण आहे, असे सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Supreme Court : घरगुती हिंसाचारप्रकरणी न्यायालयाने फटकारले, घरी सरस्वती-लक्ष्मीची पूजा करणार अन्…

एसटी प्रवासात 15 टक्क्यांची जबर दरवाढ करून राज्य सरकारने गोरगरीब व सामान्य प्रवाशांचे खिसेच कापले आहेत. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या एसटी बसचा प्रवास महाग होणार याची कुजबुज दिवाळीपासूनच सुरू होती. मात्र निवडणुकांच्या तोंडावर जनतेचा रोष ओढवून घ्यायला नको म्हणून राज्यकर्त्यांनी त्या वेळी लांबणीवर टाकलेली एसटीची दरवाढ अखेर आता जाहीर करण्यात आली, असा दावा त्यांनी केला आहे.

‘गाव तेथे एसटी आणि रस्ता तिथे बस’ हे एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य असले तरी ‘महामंडळ तिथे घोटाळे आणि घोटाळ्यातून खोके’ हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे ब्रीदवाक्य बनले आहे. त्यातूनच जनसेवेचे व्रत स्वीकारणाऱ्या एसटी महामंडळाच्या तिजोरीची लूट झाली तसेच याच लुटीच्या तोट्याचा भार आता एसटीच्या सामान्य प्रवाशांवर टाकला जात आहे. म्हणजे ‘आधी लूट आणि नंतर दरवाढ’ असा हा उफराटा कारभार सुरू आहे. आता जनतेनेच सत्ताधाऱ्यांचे हे खायचे दात त्यांच्या घशात घालायला हवेत, असा संताप ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. (Thackeray vs Mahayuti: Thackeray’s criticism on ST fare hike)

हेही वाचा – Mumbai Attack : 26/11 हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाचे भारताला प्रत्यार्पण निश्चित; अमेरिकी सुप्रीम कोर्टाने दिली मान्यता