Thackeray vs Shinde मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती आहे. यानिमित्तानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विविध क्षेत्रांतून मानवंदना दिली जात आहे. अशात शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, ठाकरे गटाचा मेळावा अंधेरीतील छत्रपती श्रीशिवाजी महाराज क्रीडा संकुलात, तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलात होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग दोन्ही पक्षांकडून आज यानिमित्ताने फुंकण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे नव्या वर्षात होणाऱ्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Thackeray vs Shinde uddhav thackeray on eknath shinde Shiv Sena UBT)
विधानसभा निवडणुकीनंतर मेळाव्याच्या निमित्ताने हे दोन्ही गट मुंबईत पुन्हा शक्तिप्रदर्शन करणार आहेत. आज (23 जानेवारी) संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट, छायाचित्रे आणि चित्रफितींच्या माध्यमातून सर्वांसमोर हा जीवन प्रवास सादर केला जाणार आहे. या महामेळाव्याच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या काही नेत्यांची भाषण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्या विजेत्यांच्याही या महामेळाव्यात गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण होईल.
2024 हे वर्ष निवडणुकांचं ठरलं असून लोकसभा, विधानसभा या महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांपैकी लोकसभेत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. मात्र विधानसभेत महाविकास आघाडीला विजय मिळवता आला नाही. राज्यातील महायुतीने 230 हून अधिक जागांवर विजय मिळवला. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीला नव्याने सरकार स्थापन करता आलं.
दरम्यान, विधानसभेतील निराशेनंतर ठाकरे गटात प्रचंड नाराजी आहे. अनेक माजी आमदार आणि निवडणुकीतील पराभूत उमेदवार ठाकरे गटाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. अशातच पक्षाने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा न केल्याने पक्षातील काही आमदारांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
याशिवाय विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्याचबरोबर आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिका स्वबळावर लढण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
हेही वाचा – Balasaheb Thackeray : मोदी-शहांनी ढोंग बंद करून बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्यावा – संजय राऊत