जितेंद्र आव्हाडांच्या सुटकेनंतर ठाण्यातील डीसीपींची थेट वाहतूक शाखेत बदली

Jitendra Awhad

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाल्यानंतर ठाण्याचे डीसीपी विनय राठोड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मला अटक करताना पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्या दबावातून डीसीपी राठोड यांनी मला अटक केली, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. परंतु जितेंद्र आव्हाड यांची सुटका होताच गृह मंत्रालयाने परिमंडल पाचमधून डीसीपी राठोड यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

डीसीपी राठोड यांच्या चेहऱ्यावर तर अटकेवेळी हतबलता दिसत होती. दर तीन मिनिटांनी डीसीपी उठायचे आणि एस… एस… सर म्हणत बाहेर जायचे आणि परत यायचे, त्यामुळे पोलिसांचा माझ्या अटकेमध्ये कोठेही दोष आहे, असे मी म्हणणार नाही, असं जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत म्हणाले. कालच्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी ठाण्याचे डीसीपी विनय राठोड यांचे नाव घेतले होते. त्यामुळे राठोड यांची बदली एवढ्या तडकाफडकी पद्धतीने कशी झाली, याची चर्चा सुरू झाली आहे.

ठाण्याच्या विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा जितेंद्र आव्हाडांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रयत्न केला होता. यावेळी आव्हाडांनी प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा चांगलेच आक्रमक झाले होते.

कालच्या अटकेनंतर आज कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण आव्हाडांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केल्यानंतर हॉलिडे कोर्टाने आव्हाडांसह इतरही १२ जणांना जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यानंतर आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनाक्रम मांडला.

ठाण्यातील उपायुक्तांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील उपायुक्तांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यातच, गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्तपद रिक्त होते. त्या जागी वागळे इस्टेट परिमंडळ ५ चे उपायुक्त विनय राठोड यांची वर्णी लागली आहे. तर ठाणे गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदाची सूत्रे शिवराज पाटील यांच्याकडे देण्यात आली आहेत. तसेच श्रीकांत परोपकारी यांच्याकडे विशेष शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी परिपत्रक काढून रिक्त असलेल्या जागी उपायुक्तांची नियुक्ती केली आहे. यामध्ये काही जण बाहेरून ही पोलीस आयुक्तालयात बदलीवर आले आहेत. ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेल याच्या उपायुक्त पदी राजेंद्रकुमार दाभाडे, वागळे इस्टेट परिमंडळ ५ च्या उपायुक्तपदी अमरसिंग जाधव, पोलीस आयुक्तालय मुख्यालय १ च्या उपायुक्तपदी रूपाली अविनाश अंबुरे, मुख्यालय २च्या उपायुक्त पदी एस एस बोरसे, भिवंडी परिमंडळ २ च्या उपायुक्त नवनाथ ढवळे, उल्हासनगर परिमंडळ ४ च्या उपायुक्तपदी सुधाकर पाठारे तर ठाणे शहर परिमंडळ १च्या उपायुक्तपदी गणेश गावडे यांची वर्णी लागली आहे. तर नियुक्ती झालेल्या १० पोलीस उपायुक्तांपैकी तिघांच्या अंर्तगत बदल्या झाल्या आहे. वागळे इस्टेटचे वाहतुक शाखेला गेले. तर विशेष शाखेचे उल्हासनगर परिमंडळ ४ तसेच मुख्यालय २ चे उपायुक्तांना ठाणे शहर परिमंडळ १ चा पदभार दिला आहे.


हेही वाचा : शिवसेना फुटीच्या तुकड्यातून नेतेच नव्हे तर, कार्यकर्त्यांच्या कुटुंबात उभ्या राहिल्या भिंती…