घरठाणेठाण्यातील लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी जनावरं ने-आण करण्यास मनाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठाण्यातील लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी जनावरं ने-आण करण्यास मनाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Subscribe

ठाणे जिल्ह्यात लम्पी रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने ठाणे जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. याक्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील गो-जातीय गुरे व म्हशी अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आले असल्याचे राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील लम्पी चर्म रोगाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यात शहापूर, भिवंडी व अंबरनाथ तालुक्यात या रोगाची साथ पसरली असून बाधीत क्षेत्राच्या ५ किमी परिघातील एकूण ५ हजार ०१७ पशुधनावर आजपर्यंत लसीकरण करण्यात आलेले व पुढील लसीकरण सुरू आहे. उर्वरीत बाधीत पशुधनावर उपचार सुरू आहेत, असे विभागाने कळविले आहे.

- Advertisement -

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी अधिसूचना जारी केली असून संपूर्ण महाराष्ट्र राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभागाने अधिसूचनेद्वारे प्राण्यांमधील सांसर्गिक रोगांचे प्रतिबंध व नियंत्रण कायदा २००९ अन्वये हा अनुसूचित रोग असल्याचे जाहिर केले आहे. या रोगाच्या प्रतिबंध, नियंत्रण व निर्मूलन या कारवाईसाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ठाणे जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. नियंत्रित क्षेत्रातील व त्या क्षेत्राबाहेरील गो-जातीय गुरे व म्हशी अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

तसेच गो-जातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतेही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, संपर्कात आलेली वैरण व अन्य साहित्य आणि प्राण्यांचे उत्पादन नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्राण्यांचे बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा व प्रदर्शन आयोजित करणे किंवा अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम पार पाडण्यास मनाई करण्यात आले आहे.

- Advertisement -

लम्पी चर्म रोग या गाई-म्हशींना होणाऱ्या विषाणुजन्य रोगाची साथ सध्या भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मु काश्मिर, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गोवा व महाराष्ट्र इ. अनेक राज्यात पसरली आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यात व तद्नंतर इतर १९ जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. १० सप्टेंबर २०२२ रोजी ठाणे जिल्ह्यात संक्रमित पशुधन निदर्शनास आले असून पशुसंवर्धन विभागाकडून सुरूवातीपासूनच आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लम्पी रोगामुळे जनावरांमधील मृत्युदराचे प्रमाण कमी राखण्यात आले आहे, अशी माहिती संबंधित विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

अंबरनाथमध्ये लम्पी स्किनचा शिरकाव, एका बैलाला लागण

अंबरनाथ तालुक्यात लम्पी स्किन या विषाणूजन्य आजाराचा शिरकाव झाला असून अंबरनाथ येथे एका बैलाला या आजाराची लागण झाली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.लक्ष्मण पवार यांनी दिली आहे.

अंबरनाथच्या लोकनगरी भागातील नंदिवाले पोपट बोंडे यांच्या बैलाला या आजाराची लागण झाली आहे. 8 सप्टेंबरला माहिती मिळाल्यानंतर जनावरांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथे पाठवण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना लम्पी स्किनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त लम्पी स्किनचे एकही प्रकरण अंबरनाथ तालुक्यात समोर आलेले नसल्याचे डॉ.लक्ष्मण पवार यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत अंबरनाथ तालुक्यात ९०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.


हेही वाचा : मुंबईतील भूखंडांना मोठा भाव, खरेदीदारांमध्ये किमतींविषयी चढाओढ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -