काय तो दांडा… सगळं ओके करणाऱ्या मुंबईतील पहिल्या नगरसेविकाच शिंदे गटात

मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेविका गटात सर्वात प्रथम बंडखोरी करण्याचा मान मिळविल्याने सध्या मातोश्रीच्या तीरावर उभ्या राहिलेल्या मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या भुवया उंचावल्या आहेत

मुंबई -: राज्यात सत्तांतर झाल्यावर शिवसेनेचे बंडखोर आमदारांचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिकेपाठोपाठ आता मुंबईतील पश्चिम उपनगरातील सेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी प्रवेश केला आहे. महापालिका निवडणूक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता पाहता त्या आगोदरच शीतल म्हात्रे यांनी, ‘ मिला मौका, मारा चौका’ अशी भूमिका घेत नगरसेवक गटांत पहिली महिला बंडखोर नगरसेविका म्हणून एकप्रकारे ‘मान’ मिळवला आहे.

विशेष बाब म्हणजे माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी, अलिबाग येथील शिवसेना मेळाव्यात सेनेशी दगाफटका करून एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या बंडखोर आमदारांच्या ‘पार्श्वभागावर’ दांडक्याचे फटके देण्याची भाषा शिवसेना खासदार व नेते संजय राऊत यांच्यासमोरच केली होती. मात्र आता त्यांनीच मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेविका गटात सर्वात प्रथम बंडखोरी करण्याचा मान मिळविल्याने सध्या मातोश्रीच्या तीरावर उभ्या राहिलेल्या मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वास्तविक, शिवसेनेच्या बंडखोर आमदार यामिनी जाधव यांचे पती व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक यशवंत जाधव यांनी सर्वात प्रथम आपल्यापत्नीसह शिंदे गटाला साथ दिली. त्यांनी अधिकृत किंवा समोर येऊन थेट शिंदे गटात माजी नगरसेवक म्हणून प्रवेश घेतलेला नाही मात्र आपल्या आमदार पत्नीला व शिंदे गटाला महाराष्ट्राबाहेर सोबत राहून साथ दिल्याने ते शिंदे गटात सामील झाल्याचे मानले जाते.

शीतल म्हात्रे या दहीसर (प.) येथील प्रभाग क्रमांक ७ मधून सन २०१२ आणि २०१७ मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी पालिका विधी समिती अध्यक्षपद व शिक्षण समिती सदस्यपद भूषविले आहे. त्यांचे बोरिवली-दहिसर पट्ट्यातील शिवसेना आमदार विनोद घोसाळकर व त्यांचे चिरंजीव अभिषेक घोसळकर यांच्याशी काही कारणास्तव ‘ पंगा’झाला होता. मिडियात सदर प्रकरण खूपच गाजले होते.

पश्चिम उपनगरातील सेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थक मानल्या जाणाऱ्या शीतल म्हात्रे यांचा मंगळवारपासून मोबाइल नंबर ‘नाॅट रिचेबल’ लागू लागल्यानंतर त्या शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. आमदार प्रकाश सुर्वे यांनीच शीतल म्हात्रे यांना, शिंदे गटात सामील केल्याचे बोलले जात आहे. त्यांनीच शीतल म्हात्रे यांची मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नंदनवन बंगल्यावर भेट घडवून आणली. आपल्यासोबत पश्चिम उपनगरातील शिवसैनिक आणि पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी झाल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे मातोश्रीला एकप्रकारे खूप मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.