ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरातील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरक्षेच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेने शहरात 1730 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. पण समोर आलेल्या माहितीनुसार, या कॅमेऱ्यांची देखभाल करणे पालिकेला शक्य नसल्याचे समोर आले. मार्च महिन्यामध्ये 300 कॅमेरे बंद पडले. त्यानंतर आणखी 113 कॅमेरे बंद पडल्याचे समोर आले आहे. कॅमेऱ्यांची दुरुस्ती तसेच, नवे कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे निधीच नसल्याचे सांगण्यात येत आहे. (Thane MNC no fund to maintain CCTV in city)
हेही वाचा : Assembly Results : भाजपाला जिंकणे महत्त्वाचे का होते? आव्हाडांच्या मुलीचा खळबळजनक दावा
ठाणे महानगरपालिका दुरुस्तीसाठी लागणारा 25 लाखांचा निधी खर्च करायला तयार नाही. त्यामुळे ठाणे पोलिसांकडून नव्याने लावण्यात येणाऱ्या 6000 कॅमेऱ्यांमध्ये हे बंद पडलेले कॅमेरे बदलून मिळावे, अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली. पालिकेच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसावा, या उद्देशाने ठाणे, कळवा आणि मुंब्रा विभागात 1730 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती ठाण्यातील हाजुरी येथे नियंत्रण कक्षात संकलित केली जाते. पण योग्य वेळेस दुरुस्ती न झाल्याने अनेक बंद पडले आहेत.
ठाण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी मार्च महिन्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेतला होता. तेव्हा 300 हून अधिक कॅमेरे बंद पडल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी काही प्रमाणात कॅमेऱ्यांची दुरुस्ती केल्याचा दावा संबंधित विभागाने केला. त्यानंतरही आता शहरातील 113 कॅमेरे बंद असल्याचे समोर आले. या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करणे, शक्य नसल्याचे पालिकेने सांगितले. त्या जागी नवीन कॅमेरे बसवण्याचा खर्च तर अशक्य आहे. दुरुस्ती आणि काही ठिकाणी कॅमेरे बदलणे याचा खर्च 25 लाखांच्या आसपास आहे. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा खर्च पालिकेला करता येणे शक्य नसल्याची माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला दिली आहे. त्यामुळे अनेक सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.