ठाणे महानगरपालिकेत कारकून पदावर कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने एकटेपणाच्या नैराश्यातून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे. मंदार भोईर नावाच्या कर्मचाऱ्याने सोमवारी संध्याकाळी फेसबुक लाईव्ह केल्यानंतर आत्महत्या केली. ३५ वर्षीय असलेल्या मंदार भोईर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्याच श्रद्धांजलीचे पोस्टर देखील बनवून फेसबुकवर टाकले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्वतःचे दुःख कथन करुन आत्महत्या केली. यानंतर भोईर यांच्या मित्रांनी हळहळ व्यक्त केली.
मंदार भोईर यांनी रविवारी फेसबुकवर श्रद्धांजलीचे पोस्टर टाकल्यानंतर भोईर यांच्या मित्रांनी फोन करुन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता भोईर फेसबुकवर लाईव्ह आले. त्यांनी त्यांच्या दुःखाबद्दल बोलायला सुरुवात केली. “मी एकटा आहे, मला कुणीही समजून घेत नाही, मी माझे आयुष्य संपवतोय”, अशी निर्वाणीची भाषा भोईर यांनी वापरली. त्यानंतर लगेचच त्यांच्या मित्रांनी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र पलीकडून कुणीही उत्तर दिले नाही. त्यानंतर काही मित्रांनी भोईर यांच्या भावाला याबाबत माहिती दिली. भावानेही तातडीने मंदारचे घर गाठले. मात्र आवाज देऊनही आतून दार उघडले नाही. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी दार तोडून आत गेले असता मंदार भोईर यांनी गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले.
नौपाडा पोलीसांनी यानंतर अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. भोईर यांनी कर्ज काढले होते. तसेच त्यांची पत्नी आणि सहा वर्षांची मुलगी त्यांच्यासोबत राहत नव्हती. भोईर यांच्या आई-वडीलांचे निधन झाल्यापासून ते एकटेच घरात राहत होते. भोईर यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना ठाणे महानगरपालिकेत नोकरी मिळाली होती. मात्र नैराश्याच्या अधीन असल्यामुळे ते कामावरही नियमितपणे जात नव्हते, अशी माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संदिप कांबळे यांनी दिली.