HomeठाणेThane : शिवसेनेची महापालिकेची तयारी; पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच पालकमंत्री राहणार?

Thane : शिवसेनेची महापालिकेची तयारी; पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच पालकमंत्री राहणार?

Subscribe

ठाणे : लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते स्वराज्य स्थानिक संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकीचे. सर्वच पक्षांनी आता महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून ठाण्यात शिवसेनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे त्यांच्याकडेच होते. त्यामुळे यंदाही हे पद त्यांच्याकडेच राहणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. (Thane Municipal election and shivsena preparation under dcm Eknath Shinde)

सध्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असलेल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजपचे आमदार जास्त आल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे भाजपकडे असावे, अशी इच्छा भाजपकडून व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले होते. यामध्येही ठाणे जिल्ह्यात भाजपचे 9 तर शिवसेनेचे 6 आमदार निवडून आले होते. मागील सरकारमध्ये शिवसेनेचे शंभुराज देसाई हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर आताच्या नवीन सरकारमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे भाजपकडे असावे, अशी मागणी आता करण्यात येत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेपेक्षा वरचढ ठरली होती. असे असतानाही शिवसेनेकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवले होते. यावेळी निवडणुकीत भाजपने जिल्ह्यामध्ये 100 टक्के स्ट्राइक रेट ठेवला तर तेच शिवसेनेचा स्ट्राइक रेट हा 90 टक्के राहिला होता. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना हे पद सोडणार नाही, असे चित्र सध्या दिसते आहे. दरम्यान, कोणताही वाद होऊ नये, यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, शपथविधी होऊन बरेच दिवस उलटूनही राज्यात नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. खातेवाटपाबाबत तीनही पक्षांमध्ये अद्याप बैठकांचे सत्र सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाची तारीख जवळ आली असताना अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. अशामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे ठरल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आणि सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणते खाते येणार? तसेच, गृहमंत्रिपद हे त्यांना देण्यात येणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Edited by Abhijeet Jadhav