विवेक फणसळकर मुंबईचे पोलीस आयुक्त

मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त संजय पांडे हे उद्या ३० जून रोजी निवृत्त होणार असल्याने त्यांच्याजागी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून विवेक फणसळकर यांची नियुक्ती झाली आहे. फणसळकर हे भाजप नेते, माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे फणसळकर यांची नियुक्ती विद्यमान महाविकास आघाडी सरकारने केली आहे की, गृहविभागाने याबाबत अंतिम निर्णय घेतला आहे, हे मात्र कळू शकलेले नाही.

१९८९ च्या आयपीएस कॅडरचे अधिकारी असलेले फणसळकर यांनी यापूर्वी वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त तर आता महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड या पोलीस विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

१९८६ च्या बॅचचे संजय पांडे हे निवृत्त झाल्यानंतर सेवाज्येष्ठतेप्रमाणे १९८७ च्या बॅचचे हेमंत नगराळे हे वरिष्ठ अधिकारी आहेत. मात्र नगराळे यांनी यापूर्वी पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त या दोन्ही पदावर काम केल्याने त्यांची निवृत्ती अशक्य होती. तर १९८८च्या बॅचचे रजनीश शेठ हे राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. तर १९८८ च्या बॅचच्या रश्मी शुक्ला या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे या तिघांचाही मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी विचार करण्यात आलेला नाही, असे गृह विभागातील सूत्राने सांगितले. त्यामुळे १९८९च्या बॅचचे फणसळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून ते गुरूवारी संजय पांडे यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

फणसळकर यांच्याप्रमाणेच १९८९च्या बॅचचे भूषण कुमार उपाध्याय हे होमगार्डचे महासंचालक आहेत. तर १९८९च्या बॅचचे संदीप बिश्नोई आणि प्रज्ञा सदावर्ते या अतिरिक्त पोलीस महासंचालक असल्याने त्यांच्या नावाचा विचार झालेला नाही.

सध्या राज्य सरकारच्या विरोधात बहुमत चाचणी उद्या(गुरुवार) सकाळी ११ वाजता विधिमंडळात केली जाणार असल्याने राज्याच्या गृहविभागाने विवेक फणसळकर यांच्या नावाने शिक्कामोर्तब केले आहे.


हेही वाचा : माझ्याच लोकांनी मला फसवलं, सहकार्याबद्दल धन्यवाद, मुख्यमंत्री भावूक