नायलॉन मांजा विक्रेत्यावर ठाणे पथकाची मोठी कारवाई, ४६ रिळ जप्त

पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या नायलॉनचा मांजा (दोरा), व ज्या माजांस काचेची कोटींग आहे, त्याची विक्री साठा व वापर यावर बंदी घालण्यात आली असताना, नायलॉन मांजा याची विकणाऱ्यास ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. तसेच त्याच्याकडून वेगवेगळ्या रंगाच्या नायलॉन मांजा असलेल्या ०७ लाकडी फिरक्या, ४६ रिळ असा एकूण १४ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उल्हासनगर १,गोल मैदान येथील “भारत पतंगवाला” या दुकानात नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार शहानिशा करून छापा टाकला. तर बॅरेक नं. ७१६, रूम नं. १०.११, हॉस्पीटल एरीया, उल्हासनगर ३ येथील रहिवासी व दुकानदार बुरो डोलनदास वासवानी (४८) हे प्रतिबंधीत नायलॉन मांजा (दोरा) ची विक्री करीत असतांना मिळून आले. त्यावेळी त्याचेकडून वेगवेगळ्या रंगाच्या नायलॉन मांजा (दोरा) असलेल्या ०७ लाकडी फिरक्या, व ४६ रिळ असा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम १८८, २९०,२९१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उल्हासनगर पोलीस स्टेशन करीत आहे.बही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उनिरीक्षक थॉमस डीसोझा पोलीस हवालदार संजय बाबर, कल्याण ढोकणे, पोलीस नाईक संजय राठोड, भगवान हिवरे या पथकाने केली.

डोंबिवलीतही जप्त केले १६ रीळ

कल्याण गुन्हे शाखेनेही विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली, महात्मा फुले रोड येथील शिवाजी धर्मा जाधव (५२) यांच्या राहत्या घरी छापा टाकून त्यांच्याकडील ८हजार रूपये किंमतीचे नायलॉन मांजा असलेले एकुण १६ रोल जप्त केले. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा (दोरा) बाळगून विक्री करीत असताना मिळून आल्याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाणे येथे भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, सहायक पोलीस निरीक्षक भुषण एम. दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक माळी, पोलीस हवालदार माने, जाधव, पोलीस कॉन्स्टेबल जरग, राठोड या पथकाने केली.


हेही वाचा : पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाबाबत दिलीप वळसे पाटलांसह अंतिम निर्णय घेणार, अजित पवारांची माहिती