घरमहाराष्ट्रUlhasnagar Firing : भाजपा आणि शिंदे गटाच्या दिलजमाईची चर्चा माखली रक्ताने...

Ulhasnagar Firing : भाजपा आणि शिंदे गटाच्या दिलजमाईची चर्चा माखली रक्ताने…

Subscribe

मुंबई : ठाण्यामध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा गोळ्या झाडल्या. लोकसभा निवडणुकांचे वारे वाहात असताना ही घटना घडल्याने तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजपा आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना ही बातमी आल्याने खळबळ उडाली. वास्तवात, गणेशोत्सव काळात भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याच्या मध्यस्थीमुळे आमदार गायकवाड आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा होती. पण गोळीबाराच्या या घटनेने ही चर्चा रक्ताने माखल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा – Sanjay Raut: आजच्या प्रकारानंतर गृहमंत्र्यांना उत्तर द्यायला तोंड उरलंय का? राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

- Advertisement -

कल्याण लोकसभा क्षेत्रातील उल्हासनगर हिललाइन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला आणि तोही वरिष्ठ पोलीस अधिकारी महेश जगताप यांच्यासमोरच! जमिनीच्या वादातून आपण महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा खुलासा गणपत गायकवाड यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, त्यांनी हा खुलासा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर भडास काढली आहे. कल्याण पूर्वेत शिंदे बापलेक माझ्यावर अन्याय करत होते. माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्यांनी ते परत केलेले नाहीत. तर, मी केलेल्या कामांचे क्रेडिट खासदार श्रीकांत शिंदे घेत होते. मला राजकीयदृष्ट्या संपविण्याचा डाव एकनाथ शिंदे यांनी आखला होता, असे गंभीर आणि सनसनाटी आरोप त्यांनी केले. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढून गुंडाराज येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील गायकवाड यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – Supriya Sule : केंद्र सरकारने राज्य सरकार बरखास्त करावं, सुप्रिया सुळे यांची मागणी

एकीकडे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजपा युती एकत्रित लढविणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगितले जात असले तरी तिथे कुरबुर सुरू होती. या मतदारसंघासाठी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत काम न करण्याचा ठराव देखील स्थानिक भाजपाने केला होता. शिंदे पिता-पुत्रांकडून भाजपाचे खच्चीकरण केले जात असल्याचा थेट आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता. मध्यंतरीच्या काळातील जाहिरात वादावरून शिंदे गट आणि भाजपामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘मी यात लक्ष घालेन,’ एवढेच आश्वासन कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत दिले होते.

या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यावेळी श्रीकांत शिंदे आणि गणपत गायकवाड हेही उपस्थित होते. त्यांच्यात झालेल्या चर्चेत श्रीकांत शिंदे आणि गणपत गायकवाड यांच्यात दिलजमाई झाल्याचे सांगण्यात आले होते. पण या गोळीबाराच्या घटनेवरून ठाणे-कल्याणमध्ये भाजपा आणि शिंदे गटामधील संबंध अजूनही विळ्या-भोपळ्याचेच आहेत, हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हेही वाचा – Ajit Pawar: लोकप्रतिनिधी असून असं वर्तन..; गृहमंत्र्यांशी चर्चा करणार, अजित पवारांकडून संताप व्यक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -