…ती व्यक्ती सत्तेला भ्रष्ट करायला सुरुवात करते, संजय राऊतांची शिंदे गट-भाजपावर टीका

Sanjay Raut made a big statement about national politics and Uddhav Thackeray

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोपविण्याचा निर्णय शुक्रवारी दिला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ऐतिहासिकच ठरला आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी केली आहे. तर, खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत शिंदे गट आणि भाजपावर टीका केली आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाने शुक्रवारी धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. निवडणूक आयागोचा हा निर्णय ठाकरे गटासाठी सर्वात मोठा धक्का होता. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा न्याय नसून सौदा आहे आणि तब्बल दोन हजार कोटींचा सौदा झाला असल्याचा धक्कादायक आरोप केला.

तर, उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे. शिवसेना नाव व चिन्हाचा निकाल देणाऱ्या निवडणूक आयुक्तांची निवड लोकशाही मार्गाने झालेली नाही. त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वच संविधानिक पदांची निवड केली जाते, मग निवडणूक आयुक्तांची निवड का केली जात नाही, असा सवाल करत निवडणूक आयुक्तांची नियुक्ती लोकशाही मार्गाने व्हायला हवी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

आम्ही मागणी केली होती की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर निवडणूक आयोगाने निकाल द्यावा. मात्र, तरीही निवडणूक आयोगाने निकाल दिला, कशासाठी घाई केली? गुंतागुंत वाढवण्यासाठी हा निकाल आयोगाने दिला, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

याच संदर्भात खासदार संजय राऊत यांनी आज, मंगळवारी महान नाटककार जॉर्ज बर्ना़ड शॉ यांचे विचार ट्वीट करत शिंदे गट आणि भाजपावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. ‘सत्ता व्यक्तीला भ्रष्ट करत नाही, पण मूर्ख व्यक्ती सत्तेत आली की, ती व्यक्ती सत्तेला भ्रष्ट करायला सुरुवात करते,’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.