घरमहाराष्ट्रदहावी - बारावीची परीक्षा जूनमध्ये ऑफलाईन पद्धतीने?

दहावी – बारावीची परीक्षा जूनमध्ये ऑफलाईन पद्धतीने?

Subscribe

पुढील आठवड्यात महत्वाचा निर्णय

राज्यात कोरोनाचे वाढलेले थैमान पाहता, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत नेमका काय निर्णय होणार? असा प्रश्न दहावी आणि बारावीच्या ३० लाखांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांनाही पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येतआहे. शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा कोरोनाच्या संकटाच्या कालावधीत न घेता ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने जूनमध्ये घेण्याबाबत सर्वचजण आग्रही असल्याचे कळते. याबाबतची अधिकृत माहिती येत्या चार ते पाच दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी जाहीर केले.

राज्यातील अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण पाहता ही परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी करण्यात येत होती. तर ऑनलाईन परीक्षा घ्या अशी मागणी करणारीही काही पालक विद्यार्थ्यांची मागणी आहे. पण सध्या राज्यात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती झाली असून राज्यात या दोन्ही परीक्षा जूनमध्ये जेव्हा कोरोनाचा प्रभाव कमी होईल त्यावेळी घेण्याबाबतची चर्चा बैठकीत झाली. खुद्द शिक्षणमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांच्याआरोग्याला प्राधान्य देणार असून येत्या चार ते पाच दिवसात याबाबतचा निर्णय होईल असे स्पष्ट केले. भाजपकडून माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा दहावी-बारावीची परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

राज्यात काही ठिकाणी कोरोनाची परिस्थिती पाहता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमार्फतही दहावी आणि बारावी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार पुढे आहेत. राज्यातील परीक्षेपूर्वी प्रक्रियेतील सर्वांचे लसीकरण करणे गरजेचे असून विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचीही मागणी त्यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी समाजातील सर्व घटकांनी सहभागी होणे गरजेचे असल्याचे मत रोहित पवार यांनी मांडले. वर्षा गायकवाड यांनी राज्यातील आमदारांशी संवाद साधला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत स्पष्ट केले की, कोरोनाच्या परिस्थितीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अनेक विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळेच शिक्षणमंत्र्यांना मीदेखील विनंती केली आहे की विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे असणार आहे. करिअर महत्वाचे आहेच; पण त्यासोबतच आरोग्यही महत्वाचे असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितल्याचे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याबाबत चिंता करू नये. शिक्षणमंत्री गायकवाड यातून नक्कीच मार्ग काढतील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

३१ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे शिवधनुष्य दहावीच्या परीक्षेला साधारणपणे १६ लाख तर बारावीच्या परीक्षेला १५ लाख विद्यार्थी बसतात. यंदा दहावीची परीक्षा येत्या २९ एप्रिल ते २० मे दरम्यान आहे. तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत आहे. त्यामुळे एकत्रित अशा ३१ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे शिवधनुष्य हे शिक्षण विभागाला पेलायचे आहे. तुलनेत एमपीएससी परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत येणारे पालक, परीक्षेच्या ठिकाणी असणारा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग पाहता मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निमित्ताने असणार आहे. त्यामुळेच शिक्षण विभागाकडून येत्या चार ते पाच दिवसांमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -