घरदेश-विदेशजेएनयूतील हल्ल्यानंतर २६/११ च्या हल्ल्याची आठवण झाली

जेएनयूतील हल्ल्यानंतर २६/११ च्या हल्ल्याची आठवण झाली

Subscribe

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हल्ल्यानंतर २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जेएनयूतील हल्ला प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. इतकंच नाहीतर राज्यातील विद्यार्थी सुरक्षित असून त्यांनी काळजी करू नये, अशी ग्वाहीही ठाकरे यांनी दिली आहे.

जेएनयूतील विद्यार्थ्यांवर रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तोंड लपवून हल्ला करणारे हे घाबरट आहेत. हल्ल्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली. तोंड लपवून हल्ला करणार्‍यांचे चेहरे उघडे झाले पाहिजेत तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रातील तरुण-विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

- Advertisement -

जेएनयूसारखा भ्याड हल्ल्याचा प्रयत्न कोणी महाराष्ट्रात केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राज्यातील विद्यापीठांमध्ये आवश्यकता असल्यास सुरक्षितता वाढवण्यात येईल. जेएनयू हल्ल्यानंतर विद्यार्थी, युवक शांततेत आपला विरोध दर्शवत असून त्यांच्या मनातील रागाला वाट काढून देत आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. दिल्ली पोलिसांनी या हल्ला प्रकरणात बघ्यांची भूमिका घेतली. हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे दिल्ली पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जेएनयूमधील आंदोलन राजकीय
दहा रुपयांत देशात कुठेही शिक्षण मिळत नाही. फक्त जेएनयूमध्येच दहा रुपयांमध्ये शिक्षण दिले जाते. जर हीच फी ६०० रुपये केली तर त्याला फार मोठी वाढ म्हणता येणार नाही. या फी वाढीला जे विद्यार्थी विरोध करत आहेत. त्यांच्या वसतीगृहाच्या बाजूच्या स्टॉलवर हेच विद्यार्थी महिन्याला ९ ते १० हजारांचे बिल करतात, त्यापैकी तीन हजार तर सिगारेटचे बिल होते. या जेएनयूतील विद्यार्थ्यांनी फुकट शिक्षण घ्यायचे आणि गरिबांच्या मुलाला शिक्षण मिळून द्यायचे नाही, हे चुकीचे आहे. तसेच जेएनयूमधील आंदोलन राजकीय प्रेरित असून याची चौकशी केली पाहिजे, असे वक्तव्य माजी मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तावडे यांनी हे वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

केंद्राच्या आशीर्वादाने हल्ला
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला दोषी ठरवले आहे. केंद्र सरकारच्या आशीर्वादामुळेच देशातील तरुणांचा आवाज दाबला जात आहे. गुंडांद्वारे हिंसा भडकवली जात आहे. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला लोकांच्या असहमतीचा आवाज दाबण्यासाठी सरकारने घडवून आणला असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादीचा मुंबईत हल्लाबोल

जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. गेट-वे-ऑफ इंडियाजवळ हल्ल्याच्या निषेधासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसोबत राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड निदर्शनाला बसले. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत घोषणाही दिल्या. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही विद्यार्थ्यांसोबत आंदोलन केले. सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चर्चगेट येथील भाजपच्या कार्यालयाजवळ निदर्शने केली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -