घरताज्या घडामोडीकोरोनाबाधिताच्या पत्त्यामुळे चुकतो नागरिकांच्या काळजाचा ठोका

कोरोनाबाधिताच्या पत्त्यामुळे चुकतो नागरिकांच्या काळजाचा ठोका

Subscribe

कॅनडा कॉर्नरपाठोपाठ पोखरीतील घटनेनंतर संभ्रम; धास्तावलेल्या नागरिकांकडून वर्तमान ठिकाणाचा उल्लेख करण्याची होतेय मागणी

अपूर्ण माहितीच्या आधारे कोरोना रुग्णांबाबत अफवा पसरवल्या जात असल्याने नागरिकांत विनाकारण दहशत निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. नांदगाव तालुक्यात पोखरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरताच तो चर्चेचा अन् भीतीचा विषय झाला. प्रत्यक्षात संबंधित रुग्ण हा मूळ पोखरी येथील रहिवासी असला तरी अनेक वर्षे तो ठाणे येथे वास्तव्यास आहे. अनेक महिन्यांपासून तो मूळ गावी (पोखरी) गेलेला नाही, असे समजते. मात्र, या रुग्णासंदर्भात पुढे आलेल्या माहितीत तो पोखरीचा रहिवासी असल्याचा उल्लेख आल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होऊन धास्ती निर्माण झाली होती.

वास्तविक ही व्यक्ती ठाणे येथून चांदवड येथे आल्यानंतर तेथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी घेण्यात आलेला स्वॅब आता पॉझिटिव्ह आला आहे. शासकीय यंत्रणेमार्फत कोरोना रुग्णासंदर्भात प्रसिद्ध केल्या जाणार्‍या यादीत तालुक्याचा उल्लेख असतो. त्यामुळे या वृत्ताने तालुक्यात खळबळ उडते. अनेकदा रुग्ण त्या ठिकाणी वास्तव्यास नसतो. परंतु, मूळ पत्ता म्हणून गावाचे, तालुक्याचे नाव पुढे येताच अनेकांची झोप उडते. असाच काहीसा प्रकार नांदगाव तालुकावासियांनी अनुभवला. त्यामुळे शासकीय यंत्रणांनीही कोरोनाबाधितांची माहिती प्रसिद्ध करताना त्यांच्या वर्तमान ठिकाणाचा उल्लेख प्रथम करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या महिन्यात नाशिक शहरातही कॅनडा कॉर्नर परिसरात वृद्धा पॉझिटिव्ह आढळल्याची बाब प्रशासनाने जाहीर केली होती. परंतु, प्रत्यक्षात या रुग्णाचा मुलगा तेथे वास्तव्यास होता आणि संबंधित वृद्धा माणेकशा नगर येथे वास्तव्यास असल्याचे समोर आले होते. यामुळे माणेकशा नगर परिसर सील करण्यात आला होता. मात्र, सायंकाळी उशिरा प्रशासनाने कॅनडा कॉर्नर येथील महिला बाधित आढळल्याची माहिती दिल्याने रात्रभर या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. तसेच परिसर सील करण्याबाबतही तर्क-वितर्क लढवले जात होते. यामुळे कोरोना रुग्णाचे वर्तमान ठिकाण उल्लेखित असल्यास नागरिकांचा संभ्रम टळू शकेल, अशा प्रतिक्रियाही नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -