राज्यातील ७ मतदारसंघांमध्ये सरासरी ६२ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम आणि गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. याठिकाणी सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याची माहिती पुढे आली आहे.

Election
प्रातिनिधिक फोटो

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम आणि गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. याठिकाणी सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भातील अधिकृत आकडेवारीनुसार संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात ५८ टक्के, वर्धा लोकसभा मतदारसंघात ५९ टक्के, चंद्रपूर ६५ टक्के, रामटेक – ६० टक्के, भंडारा-गोंदिया – ७२ टक्के तर गडचिरोली-चिमूर मतदार संघात ६१.३३ टक्के आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ५८ टक्के मतदान झाले.

अशी आहे आकडेवारी

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु असल्यामुळे सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या अंतीम टक्केवारीची माहिती पोलिंग पार्टीद्वारे संपूर्ण माहिती विधानसभा मतदारसंघनिहाय गोळा करण्याचे काम सुरू आहे. विदर्भातील सातही लोकसभा मतदारसंघात आज झालेल्या मतदानाच्या अंदाजानुसार सरासरी मतदानाची शक्यता पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५८ टक्केपर्यंत मतदानाची शक्यता आहे. तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघात – ५८ ते ६० टक्के, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुमारे ६५ ते ६८ टक्के, गडचिरोली-चिमूर ७० ते ७२ टक्के, भंडारा-गोंदिया ६९ ते ७१ टक्के तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघात सरासरी ६५ टक्के मतदानाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मतदानादरम्यान कुठेही अनूचित प्रकार झाला नसून निवडणूक यंत्रणेसोबतच पोलिसदलातर्फे सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.