घरताज्या घडामोडीभाजप नगरसेविकेच्या पतीने बिटको रूग्णालयात थेट इनोव्हा कार घुसवली

भाजप नगरसेविकेच्या पतीने बिटको रूग्णालयात थेट इनोव्हा कार घुसवली

Subscribe

कर्मचार्‍यांना मारहाण, हॉस्पिटलच्या काचा फोडत घातला राडा

 

बिटको रूग्णालयात शनिवारी सायंकाळच्या सुमारास इनोव्हा कार घुसवून रूग्णालयाची मोठया प्रमाणात तोडफोड करण्यात आली. यावेळी रूग्णालयातील कर्मचार्‍यांना मारहाण व शिवीगाळही करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार भाजप नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र (कन्नू) ताजणे यांनी हा धुडगूस घातल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

नाशिकरोड येथील बिटको रूग्णालयात सुमारे पाचशे ते सहाशे कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नाशिक जिल्हा हा देशातील सर्वाधिक कोरोना प्रभावित जिल्हा ठरला. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण आहे. नाशिक महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये नाशिक शहरातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील रूग्णही उपचार घेत आहेत. सर्वाधिक रूग्ण हे महापालिकेच्या बिटको रूग्णालयात उपचार घेत आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानकपणे एक पांढर्‍या रंगाची इनोव्हा कार रूग्णालयात घुसली. क्षणार्धात ही कार रूग्णालयाचे प्रवेशव्दार तोडून थेट रूग्णालयात शिरली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी रूग्णालयाच्या काचांची तोडफोड करण्यात येऊन परिसरातील कर्मचार्‍यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. यावेळी स्ट्रेचर आणि ऑक्सिजन टँकचे नुकसान करण्यात आले. काही कळायच्या आत पुन्हा ही कार रूग्णालयातून बाहेर पडली. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. धनेश्वर यांनी याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. घटनेनंतर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत घटनेमागील कारणाचा शोध आणि अधिक तपास सुरू होता.

भाजप नगरसकेच्या पतीचा प्रताप
मिळालेल्या माहितीनुसार सदरची व्यक्ती ही भाजप नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे असून, तोडफोडीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार ताजणे यांच्या वडीलांचे काही दिवसांपूर्वी याच रूग्णालयात निधन झाले होते. तसेच, येथे रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याची त्यांची तक्रार असल्याचेही समजते.

- Advertisement -

रूग्णांमध्ये घबराट, नातेवाईकांची धावपळ
बिटको रूग्णालयात अनेक रूग्ण उपचार घेत असून, परिसरात रूग्णांच्या नातेवाईकांची वर्दळ होती. वातावरण सामान्य असताना अचानक सुसाट आलेल्या कारने काही क्षणात होत्याचे नव्हते केले. भरधाव कार रूग्णालयात शिरल्याने परिसरातील रूग्णांच्या नातेवाईकांची एकच धांदल उडाली. रूग्णांचा जीव टांगणीला लागला. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -