घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअवकाळीचा तडाखा; गहू, कांदा, मका, द्राक्ष, पालेभाज्यांवर पाणी

अवकाळीचा तडाखा; गहू, कांदा, मका, द्राक्ष, पालेभाज्यांवर पाणी

Subscribe

नाशिक : जिल्ह्यासह शहराला अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा फटका सामान्य नागरिकांसह शेतकर्‍याला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. या पावसामुळे वातावरणामध्ये काहीसा गारवा जरी निर्माण झाला असला तरी या वातावरण बदलाचा शेतकर्‍याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. रब्बी हंगामातील द्राक्ष, कांदा, गहू, टोमॅटो यासारख्या पिकांना अवकाळीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. ऐन काढणीला आलेल्या गहू, टोमॅटो, कांदा ही उभी पिके अक्षरशः शेतात आडवी झाली आहेत. यामुळे शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे.

पाथर्डी गाव, पिंपळगाव बहुला, अंबड, चुंचाळे, धरणगाव, वाडीवर्‍हे, विल्होळी यासारख्या शेतीबहुल भागातील सामान्य शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे पहायला मिळत आहे. याआधी द्राक्षाचे दर कोसळले आहेत. त्यातच आता अवकाळीने झोडपल्याने उत्पादन खर्चही भरून निघतो की नाही अशी परिस्थिती शेतकर्‍यासमोर उभी राहिली आहे. आधीच भाज्यांचे भाव नसल्याने अगदी कवडीमोल भावात विकावे लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे, त्यातच गेल्या वर्षीच्या पावसाळ्या दरम्यान शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असतानाच त्या पिकांचा सरकारने केलेल्या पंचनाम्याचे पैसे शेतकर्‍यांना अद्यापही मिळालेले नसताना पुन्हा एकदा या आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे शेतकर्‍याने पुन्हा एकदा सरकारकडे या अवकाळी पावसामुळे पिकांचं झालेलं नुकसान लवकरात लवकर भरून निघावं अशी अपेक्षा केली आहे.

- Advertisement -

रविवारी मध्यरात्री तसेच सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील पाथर्डी ते नासर्डी दरम्यान पिंपळगाव , अंबड ,विल्होळी सह सर्वच मळे भागात हाती आलेल्या शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन , यामुळे लागलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी वर्गातुन चिंता व्यक्त केली जात आहे. शहरालगत असलेल्या गावां मधुन शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, गहू, टोमॅटो तसेच पाले भाज्या मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु अकाली झालेल्या पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे द्राक्षाच्या घडाला लावलेले पेपर फाटल्याने द्राक्ष मण्यांना तडे पडले. यामुळे विदेशात माल विकला जाणार नाही. कमी दराने विक्री केली तर खर्च ही निघणार नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले. काही शेतकर्‍यांचा तर येत्या दोन ते चार दिवसात व्यापारी माल नेणार होते . पण त्या आधिच मालाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच गहु पिका बरोबर टोमॅटो, कोथिंबिर, मेथी, पालेभाज्याही भुईसपाट झाल्या आहेत. मालाला चांगला भाव मिळाला असता पण पावसाच्या लहरीपणामुळे कवडीमोल भावाने विक्री करावी लागणार आहे. शासनाने शेतकर्‍याकडे लक्ष देण्याची मागणी शिवसेनेचे त्र्यंबक कोंबडे, बालम शिरसाठ, बंडू धोंगडे, धनंजय गवळी, विष्णू कोंबडे, अंबादास जाचक, सदाशिव जाधव, विश्वनाथ मुंडे व इतर शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -