कुजलेल्या अवस्थेत आढळला बेपत्ता व्यापार्‍याचा मृतदेह

सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बेलापूर येथील ४९ वर्षीय व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचा मृतदेह वाकडी शिवारात सातव्या दिवशी कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्याची सुपारी देऊन हत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सोमवार, दि. १ रोजी सायंकाळी सात वाजेपासून गौतम हिरण बेलापूर येथून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी फिर्याद पंकज झुंबरलाल हिरण यांनी बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता हिरण नेहमीप्रमाणे गोदाम बंद करून हिशोबाच्या वह्या व रोख रक्कम घेऊन दुचाकीवरुन घराकडे निघाले. त्यावेळी अनोळखी व्यक्तींनी बेलापूर बायपास येथे त्यांची दुचाकी अडविली. त्यांना एका चारचाकी वाहनात बळजबरीने बसविले. वाहनात नेत असताना अनेक लोकांनी पाहिले आहे. पोलिसांना गौतम हिरण यांची दुचाकी श्रीरामपूर बेलापूर बायपास जवळ आढळून आली आहे. विशेष म्हणाजे, गाडीला चावी, हिशोबाची कागदापत्रे, वह्यांची पिशवीही गाडीलाच आढळून आली आहे. त्यामुळे त्यांचे पैशाकरीता अपहरण केले असावे, असा संशय नातेवाईकांना आहे.

सहा दिवस झाले तरी पोलिसांना हिरण यांचा शोध लागत नव्हता. या मागणीसाठी बेलापूर गावातील नागरिकांनी एक दिवस गाव बंद ठेवून हिरण यांचा शोध त्वरीत लावावा, अशी मागणी केली होती. रविवारी (दि.७) वाकडी शिवारात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह असलल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह हा हिरण यांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.