देशातून इंग्रजांनाही जावं लागले; शरद पवार यांचा भाजपला टोला

धुळे : आज देशामध्ये एक वेगळे चित्र आहे. संपूर्ण देशातील सत्ता एका हातात केंद्रित करण्याचे काम केले जात आहे. सत्तेचा गैरवापर करून धमकावलं जातयं. आम्हाला वाटेल तसा देश चालवू अशी काहीशी परिस्थिती आहे. परंतू ज्यांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता असे इंग्रज या देशात होते. पण गांधींच्या नेतृत्वाने देशाने एकजूट दाखवली आणि इंग्रजांना या देशातून घालवल. इंग्रजांचा पराभव या देशातील सामान्य माणूस करू शकतो, त्याच देशात जर दमदाटीचं वातावरण कोणी करत असेल तर त्यांनाही धडा शिकविण्याची ताकद सामान्य माणसाकडे आहे अन ती दाखवल्याशिवाय सामान्य माणूस राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

धुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी आयोजीत सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, आज देशाची सत्ता एका हातात केंद्रित झाली आहे. सत्तेचे काही दोषही असतात. केंद्रित झालेली सत्ता सामान्य माणसाला यातना देत असते. १९६० साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रिकरण करण्याचा निर्णय घेतला. पंचायत राज व्यवस्था निर्माण केली. जिल्हा परिषद, पंचायत समित्या काढल्या. यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार गावातल्या शेवटच्या घटकाकडे दिला. यामुळे सत्ता अधिक लोकांच्या हातात गेली तर ती कधी चुकीच्या रस्त्यावर जात नाही अन जर गेलीच तर लोक धडा शिकवतात. आज काय दिसतयं आपल्याला, अनेक ठिकाणी सत्तेच गैरवापर होत आहे. धमकावलं जात. सबंध देशाचे मालक आपण आहोत असे चित्र निर्माण केले जातयं. वेगळया रस्त्याने हा देश चालवणारे हे दाखवण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. काय पडेल ती किंमत देउ पण या देशाच्या लोकशाहीचं जतन करू.अत्याचार करणारया प्रवृत्तीच्या विरोधात एकसंघ राहून संघर्ष करू असा इशारा पवार यांनी दिला.

तर संसदेत भीषण घटना घडली असती

काँग्रेसच्या एका नेत्याने राष्ट्रपतींचा चुकीचा उल्लेख केला. यावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला. या मुददयावरून संसदेत गदरोळही झाला. नंतर या खासदाराने माफी मागण्याची तयारीही दाखवली. पण भाजप नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या माफीची मागणी केली. बोलले एक आणि माफी मागण्याची मागणी सोनिया गांधी यांच्याकडे केली गेली. त्यावर मी का माफी मागावी असा सवाल सोनिया गांधी यांनही केल्यावर त्यांच्यावर लोक धावून गेले. राष्ट्रवादीच्या खासदारांनी सोनिया गांधींना तेथून बाहेर काढले अन्यथा सदनात भीषण चित्र बघायला मिळाले असते असे ते म्हणाले.

राज्यपालांकडून दुजाभाव

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाची निवड घेण्याचा निर्णय घेतला गेला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्याबाबत राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला पण दोन वर्ष त्यांनी दखल घेतली नाही पण सत्तांतरानंतर दोन दिवसांत राज्यपालांनी आदेश काढला अन निवडणूक घेण्यास परवानगी दिली. राज्यपाल एक वर्षापूर्वी एक अन सत्ता बदलानंतर दुसरी भुमिका घेतात त्यामुळे लोकांनी विश्वास कसा ठेवायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला.