पीपीई किटचा वापर करून सराफ दुकान फोडले

एकाच दिवशी दोन घटना; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

रविवार कारंजा येथील नॅशनल युको बँकेच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी आत प्रवेश करत लूटीचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असताना महानगरात गुरुवारी (दि.१३) चोरट्यांनी एकाच दिवशी दोन सराफ दुकाने फोडण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे सराफ व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी आता चोरीची नवी शक्कल शोधली असून चोरटे पीपीई किटचा वापर करून दुकानात घुसल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

नाशिक महानगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सकाळी महानगरातील जेलरोडच्या शिवाजीनगर भागातील तेजस्वी ज्वेलर्स आणि काठेगल्लीतील मोहिनीराज ज्वेलर्स चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. तेजस्वी ज्वेलर्स दुकानाचे ग्रील तोडून चोरीचा प्रयत्न रात्री ४ वाजेच्या सुमारास झाला. अल्टो कारमधून चार चोरटे दुकानाबाहेर आले. चोरट्यांनी दुकानाबाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेरा व ग्रील तोडले पण दुकानाचे शट्टर तोडता न आल्याने चोरटे रिकामे परत गेले. मोहिनीराज ज्वेलर्सची लोखंडी जाळी कट करून व शटर वाकवून आत प्रवेश केला. चोरट्यांना लॉकर तोडता न आल्याने कुठलेही नुकसान झाले नाही. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने चोरीचा डाव फसला. मोहिनीराज ज्वेलर्सध्ये चोरटे पीपीई कीटचा वापर करून आत घुसल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. सराफ दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास सुरू केला आहे.

एक महिन्यापुर्वीच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडून खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व व्यवसायिक सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करत आहेत. महानगरात दोन दिवसात ३ सराफ दुकानात चोरीच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी रात्री महात्मानगर, गुरुवारी पहाटे 4 वाजाता जेलरोड येथील तेजस्वी ज्वेलर्स आणि सकाळी 6 वाजेदरम्यान मोहिनीराज ज्वेलर्स येथे चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चेतन राजापूरकर अध्यक्ष, सराफ असोसिएशन

मोहिनीराज ज्वेलर्समध्ये चोरटे घुसल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. दुकानातील सोने, चांदी मालकाने आधीच सुरक्षित ठिकाणी ठेवल्याने मुद्देमाल चोरीला गेलेला नाही. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.
साजन सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे